Saturday 6 April 2019

 Doppelganger & आपण 

शास्त्रज्ञांच्या मतानुसार जगात एक सारखे दिसणाऱ्या   अंदाजे ७ व्यक्ती असतात।  विज्ञानाच्या कसोटीवर याचा विचार करायचा झाला तर  मानवी शरीर  हे ज्या जनुकीय संरचनेतून घडले आहे ती  रचना एखाद्या पत्त्यांच्या जोड़ीसारखी आहे।   पत्त्यांच्या  खेळात जसे दरवेळी वेगवेगळे पत्ते येतात तशा प्रकारे  वेगवेगळ्या जनुकांच्या मिश्रणातून  वेगवेगळी मानवी शरीरे  घडत असतात . मग पत्त्यांच्या खेळात जशी एखाद्या वेळेला ठरवून घेतल्या सारखी एक सारखी पानेच वाट्याला येतात त्याप्रमाणे जनुकीय  संरचनेत एकसारख्या गुणसूत्रानी गट्टी जमविल्यासारखी दोन अगदी भिन्न माणसे एकमेकांसारखी एकाच मुशीतून तयार झाल्यासारखी वाटतात। " अरे तुझ्या सारखा दिसणारा माणूस  पाहिला  अणि विश्वासच बसला नाही रे "   कधी ना कधी   आपण  कोणाकडून  तरी हे  वाक्य ऐकलेले  असते। आज हे आठविण्याचे कारण  म्हणजे  " Amanda Cerny" नावाची  हॉलीवुड मधील अभिनेत्री  अणि तिची भारत यात्रा। या बाई साहेब  आपल्या "Doppelganger" ला भेटण्यासाठी भारतात येत आहेत.  ती " "Doppelganger"" आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री (?) " जैकलीन फर्नांडेज़ ". 

"Doppelganger" या मुळच्या जर्मन शब्दाचे  मराठी भाषांतर करायचे झाले तर " एकसारखी दिसणारी दोन भिन्न माणसे " किंवा " अनोळखी जुळे " असा काहीसा करता येईल।  दोन एकसारख्या दिसणाऱ्या पण काहीही बायोलॉजिकल संबंध नसणाऱ्या व्यक्ती।  

सध्या समाज माध्यमांमध्ये याची खूप चर्चा चालू आहे।  प्रथम ती रंगली  कारण अनुष्का शर्मा अणि तिची  "Doppelganger"जूली मिचेल्स यांचे  ऑनलाइन चॅटींग अणि आता  "Amanda Cerny"  ची भारत भेट। 

उत्सुकता म्हणून थोड़े खोलात जाऊन तपासले तर लक्षात आले की शब्दश: "Doppelganger" याचा अर्थ आहे  " स्वतःची सावली ( shadow of self)" किंवा " भूतिया, असामान्य शक्ती " असा ही आढळतो।  बोली भाषेतील त्याचा अपभ्रंश (Slang language) म्हणजे "दोन एकसारखी दिसणारी  पण  अनोळखी  माणसे ". 

आजच्या प्रतिमानिर्मितीच्या( इमेज बिल्डिंग) दुनियेत मला हा शब्द अणि त्याचा अर्थ  खूप भावला। अणि नकळत मन जुन्या आठवणींमध्ये रमले। 

सांगलीमध्ये माध्यमिक  शाळेत आम्हाला जे मराठी शिकविणारे सर होते  ते जीवन जगण्याचे ध्येय(Goal) अणि त्याच्या प्रक्रियेचे महत्त्व( Process) एका सुंदर उदाहरणातून उलगडून सांगायचे।  ते कोकणातील असल्यामुळे उदाहरण अर्थातच अस्सल कोकणी मातीतले।त्यानुसार आपले जीवन हे नारळाच्या झाडावर चढण्यासारखे आहे. नारळाच्या झाडाचे जर आपण बारीक़ निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येईल की  त्या उंच झाडावर चढ़णे  ही एक तपश्चर्या आहे। लांब सड़क झाडावर चढताना त्याचा बुंध्यावरून दोन्ही पायाचे अंगठे बांधून वर चढ़त जावे लागते। मधे विश्रांति घेतो म्हटले तर थांबायला ना फांदी आहे ना आधाराला पारंबी।  बर इतके करुन आपण शेंड्यापर्यन्त पोहचलो की प्रथम नारळ कापून खाली पाडायचे।  खाली उतरून मग तो नारळ सोलायचा अणि  फोडायचा।  नारळात पाणी किती किंवा चांगले खोबरे आहे का याचा निकाल तो फोडल्यानंतरच। म्हणजे  झाडावर चढण्याची जी क्रिया( Process) आहे ती महत्त्वाची। पायाचे अंगठे बांधून चढ़णे  म्हणजे जगण्यातील  
अडीअडचणी अणि संकटांसारख्या।भरपूर पाणी  असलेला अणि खुप खोबरे असलेला नारळच(Goal)  हाती लागेल  यात प्रयत्नाबरोबर नशीबाची साथ पण तितकीच गरजेची आहे।

थोडक्यात  जीवन म्हणजे  " साधनांकड़े & प्रक्रियेकडे ( Resources & Processes) लक्ष्य देत "साध्याकडे" ( Goal) केलेला प्रवास  ही वास्तविकता समोर मांडणारे उत्तम उदाहरण। साध्य हाती लागले तर आनंद निश्चितच जास्त; नाही लागले तरी तो प्रवासच एक प्रकारचे समाधान देणारा।

या  वास्तवाला छेद देणारे  पण  प्रतिमानिर्मिती  करुन , जे  आभासी जग निर्माण होते तेच  खरे जग आहे असे समजण्याकडे सध्या आपला कल वाढतो आहे।  समाज माध्यमे त्याला पोषक भूमिका घेताना दिसत आहेत। 

याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो आहे। आपला आनंद हा समाज माध्यमांवर  मिळणाऱ्या अंगठ्यांच्या (Likes) हिंडोळ्यावर वर खाली होत असतो। जितके जास्त अंगठे तितका जास्त आनंद।  आपले प्रोफाइल , फोटो , आपण कुणाला फॉलो करतो , आपले  छंद ,आपल्या  आवडीनिवड़ीचे जाहीर प्रदर्शन   हे प्रतिमानिर्मितीचे " बिल्डिंग ब्लॉक्स " च म्हणावे लागतील। यातून आपण काय काय  "साध्य " केले आहे हे सांगण्याची जणू स्पर्धाच लागली आहे।    गंमतशीर  उदाहरण म्हणजे " स्टेटस  अपडेट: :Having Lunch in Taj with Hubby ".  आता सामान्यत: यामध्ये काय  गैर आहे असे वाटेल।  थोड़ा शांतपणे विचार केला तर तुम्हाला जाणवेल की हा अपडेट   " मी  उदरभरण करते आहे " याची वर्दी नसून " ताज सारख्या पंचतारांकित  हॉटेलमध्ये  मी बसले आहे "याची जाहिरात आहे। " उदरभरण " या प्रक्रियेपेक्षा " मी पण पंचतारांकित हॉटेलमध्ये  होते " या "साध्य" वर  जास्त  भर आहे कारण आनंद हा या अपडेटला  मिळणाऱ्या  अंगठ्यांच्या (Likes) संख्येवर मोजला जाणार आहे। 

बर  आता एकदा प्रतिमा निर्मिती केली  आणि विषय संपला असे थोडीच आहे।  प्रतिमासंवर्धन  हे किंबहुना त्याहून जास्त जिकरीचे  काम आहे। " रोज काहीतरी नवीन " च्या अट्टाहासामुळे " साधे सुंदर आयुष्य " हातातून निसटुन जाते आहे। ही प्रतिमा रूपी सावली( shadow of self) आता इतकी मोठी अणि सर्वव्यापी झाली आहे की  खरा मी कोण हा यक्षप्रश्न  बनला आहे। खऱ्या अर्थाने " आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी " अशी परिस्थिति आहे. 

पुन्हा मला तेच मराठीचे  सर अणि त्यांनी शिकविलेली मर्ढेकरांची कविता आठवते " आम्हांस आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा ". या कवितेत म्हटल्याप्रमाणे  आपल्या प्रतिमा रूपी सावलीचे  ( shadow of self) म्हणजेच "Doppelganger" चे अवलोकन करुया अणि खऱ्या मीला शोधून प्रतिमा रूपी सावलीच्या जोखडातून मुक्त होऊयात।  

ते करण्यासाठी  गुढीपाडव्यापेक्षा चांगला दिवस तो कोणता।  सर्वाना "गुढीपाडव्याच्या  हार्दिक शुभेच्छा"

चला तर मग  भेटुया आपल्या  "Doppelganger" ला  खऱ्या "मी "ला शोधण्यासाठी। 



2 comments:

  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...