Saturday 15 May 2021

             
                                                                   कालाय तस्मै नमः !

" महाराष्ट्रात मराठे लोकास जो मान आहे तो त्यांच्या वाडवडिलांच्या शौर्यामुळे  त्यास प्राप्त झाला आहे. व तशा प्रकारचे शौर्य ,धाडस व देशाभिमान हे गुण जोपर्यंत त्यांच्यामध्ये जागृत राहतील तोपर्यंत त्यांचा मान कधीही कमी व्हावयाचा नाही. वेदोक्त कर्म करणारे ब्राह्मण पाणी भरतात आणि पुराणोक्त कर्म करणारे मराठे राज्य पदाचा अनुभव घेतात  हे जर आपण डोळ्यांनी पहात आहोत तर वेदोक्त  मंत्रांनी  आपले संस्कार झाले पाहिजेत असा आग्रह धरणे चुकीचे नव्हे काय? संस्काराच्या वेळी वैदिक मंत्र म्हणणे हे आज हजारो वर्षे चालत आलेल्या वही वाटीने एका विशिष्ट जातीतील पुरुषांचे लक्षण झाले आहे परंतु जाती जातीत  जो काही मान आहे तो या लक्षणावर नसून त्या  त्या ज्ञातीत कार्यकर्ते पुरुष ज्या प्रमाणात निपजतात  त्या प्रमाणावर आहे ही गोष्ट इतिहासावरुन सिद्ध होते.  असे असता केवळ अज्ञानाने किंवा मत्सराने एका जातीने दुसऱ्या जातीच्या विशिष्ट लक्षणाचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करावा व त्यास शहाण्या माणसांनी उत्तेजन द्यावे हे बरोबर नाही........ 

..... महाराष्ट्रात मराठी लोकांचा मान कमी आहे असेही नाही व तो वेदोक्त कर्म केल्याने वाढेल असेही नाही तेव्हा  विनाकारण खोट्या अभिमानास बळी पडून मराठे संस्थानिकांनी  राजा या नात्यानेतिऱ्हाईत पणाचा जो अधिकार त्यांजकडे आहेतो अविचारीपणाने  घालवू नये एवढीच त्यास आमची विनंती आहे."

    ------वेदोक्ताचे खूळ:१/२..दिनांक २०/२९ ऑक्टोबर १९०१-केसरी अग्रलेख : लोकमान्य टिळक                

 क्षत्रिय राजा म्हणून शाहू महाराजांना  वेदांचा अधिकार असायला हवा. तो  देण्याचा ब्राह्मणांनी नाकारला. तो वर्णसिद्ध अधिकार मिळवण्यासाठी शाहुंनी लढा देऊन ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणारी मोहीम उघडली." वेदोक्त प्रकरण" म्हणून हा संघर्ष आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात ओळखला जातो.

वर उल्लेख केलेला लोकमान्यांचा केसरीतील अग्रलेख या संदर्भातीलच . लोकमान्यांनी क्षत्रियत्वसंबंधीची  कर्मठ ब्राह्मणांची हास्यास्पद भूमिका उचलून धरली नसती तर वाद इतका विकोपाला गेला नसता. 

पुरोगामी विचारवंत नरहर कुरुंदकर याचा उल्लेख "अभिजात मूर्खपणा" असा करून सांगतात की लोकमान्यांसारखा महान राजकीय नेता परंपरावाद्यांच्या  बाजूने उभा राहिला  व धर्मात लुडबूड न करता पारंपारिक रीतीरिवाज यांचे निष्ठेने पालन करावे अशी भूमिका मांडून गेला.

 या प्रकरणात लोकमान्यांनी अशी तर्कविसंगत भूमिका का घेतली या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे आहे.

  राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम, त्यासाठीचे  राजकारण याला असणारा अग्रक्रम  आणि सामाजिक सुधारणांमुळे समाजात दुही  किंवा गोंधळ निर्माण होऊन आपले प्रयत्न विखुरले जातील ही भीती,  शाहूंच्या भूमिकेला पाठिंबा देऊन  आपला समर्थक ब्राह्मण मंडळींचा पाठिंबा दुरावण्याची  शक्यता यामुळे लोकमान्यांनी राजकारण्याला शोभेल अशी  भूमिका घेतली।
 
वरवर पाहता ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष ही जातीची लढाई  दिसत असली तरी  तो नव्या शिक्षणातून निर्माण झालेला सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक हितसंबंधांचा संघर्ष होता.

 पेशव्यांनी मराठा राज्याच्या कारभाऱीपणाची वस्त्रें मिळविली  तेव्हापासून मराठा राज्यात ब्राह्मणांचे वर्चस्व वाढू लागले. बडोदा, ग्वाल्हेर यासारखी संस्थाने सोडता महाराष्ट्रातील मराठी कुलवंत सरदार घराणी पहिल्यांदा आळसात गेली  व नंतर वैफल्यग्रस्त झाली. पेशवाईच्या उत्तर काळात मराठा समाज खूप पिछाडीवर पडला. १८१८ मध्ये जेव्हा पेशवाई बुडाली  व पुणे ,पश्चिम महाराष्ट्र येथे इंग्रजांचे राज्य आले तेव्हा ब्राह्मण हाच मराठी समाजाचा सर्वेसर्वा होता. राज्य गेले तरी इंग्रजांची चाकरी करण्यासाठी व इंग्रजी भाषा शिकण्यासाठी पुढे आला तो ब्राह्मण वर्गच. शिक्षणात घेतलेल्या पुढाकाराने व त्यायोगे इंग्रजी शासनात मिळालेल्या स्थानाने ब्राह्मण लोकात श्रेष्ठत्वाचा गंड व इतर जाती विषयांची तुच्छता अधिकच वाढली. पारंपारिक उच्च गंडाचे सामुहिक विकृतीत रूपांतर झाले. इतर जाती नगण्य व निष्प्रभ झाल्या. उच्चकुलीन व सरदार घराण्यांनी ही मराठा जाती समूहाला नव शिक्षण देण्यात विशेष रस दाखवला नाही. जणू काही व्यापक सामाजिक जीवनातून मराठा जात निवृत्त झाली. उदासीनता भरून वाहू लागली होती.

 वेदोक्त प्रकरणातील धक्क्यांनी शाहू महाराजांनी जेव्हा या परिस्थितीचे अवलोकन केले तेव्हा जे दृश्य समोर आले ते असे होते.
 
पतपेढी चा कारकून ब्राह्मण, बँक अधिकारी ,सहकारी कर्मचारी ब्राह्मण, शाळेतील शिक्षक ब्राह्मण, सावकार- जमीनदार- व्यापाऱ्यांचे मुनीम ब्राम्हण, डॉक्टर, वकील आणि न्यायाधीश ही ब्राम्हण. या सार्वभौम वर्चस्वाचा पाया होता अर्थातच आधुनिक शिक्षण.

 वेदांचा अधिकार हे जर आपण जातीची उतरंड  मोडून upward mobility साठी  केलेली प्रतीकात्मक गोष्ट मानली तर या प्रतीकात्मकतेच्या  पुढे जाऊन शाहू महाराजांनी बऱ्याच गोष्टी केल्या

    १.  बहुजन समाजात शिक्षण घेण्याची आस त्यांनी निर्माण केली. 
    २. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचाराचा पगडा निश्चित होता पण त्याचबरोबर शाहुंनी मराठा समाजाला व्यापार         व उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. 
    ३. आपल्या संस्थानातील नोकऱ्यांमध्ये 50 टक्के नोकऱ्या ब्राह्मणेतर समाजासाठी आरक्षित ठेवल्या. 
    ४. सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची ऊर्मी ब्राह्मणेतरांमध्ये त्यांनी निर्माण केली.

 शाहूंच्या मदतीने पाठ शाळेतून ब्राह्मणेतर पुरोहित तयार होऊ लागले. सत्यशोधक पद्धतीने धार्मिक विधी ,विवाह मुंज याचे प्रमाण वाढू लागले. पण बरेच ठिकाणी ही परंपरागत जोपासलेल्या "निरर्थक कर्मकांडाची भ्रष्ट नक्कल" होती. पुढे जाऊन हा वैचारिक गोंधळ या चळवळीच्या मुळावर उठला.
      ब्राह्मणेतरांमधील संख्येने मोठा असलेला मराठा समाज; फुले  यांच्या विशुद्ध सत्यशोधक विचारसरणीला फारसा अनुकूल नव्हता. त्यामुळे त्यांनी या चळवळीतील "ब्राह्मण विरोधाचा व्यवहारी मुद्दा" उचलून निवडणुकीच्या राजकारणात कौशल्याने वापरायला चालू केले.  कुलवंत सरदार ,जमीनदार, इनामदार अशा ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना मुख्य प्रवाहातील राजकारणात हिरवी कुरणे खुणावू लागली. याच्यासाठी खुबीने वापरलेली माध्यमे म्हणजे तमाशे आणि जलसे.

    १. १९२०ते १९३० च्या  दरम्यान तमाशा पद्धतीने" टिंगल-टवाळी" करून ग्रामीण भाषेत प्रस्थापित मक्तेदारीचा             बुरखा फाडणारे फड प्रसिद्ध झाले. 
    २. तर दुसरीकडे अश्लील विनोदांनी मनोरंजन करत प्रस्थापितांना झोडपणारे जलसे वातावरणात विखार निर्माण         करू लागले.

 त्याची परिणीती झाली ती राजकीय सत्ता हस्तगत करून मिळणारे फायदे उचलण्यासाठी. बहुजन समाज या चळवळीचा भाग असला तरी त्याचं नेतृत्व मात्र कुलवंत सरदार, जमीनदार यांच्याकडेच राहिले. शेती, शेती आधारित कारखानदारी यातून ग्रामीण अर्थकारणावर पकड मजबूत करणारी आर्थिक हितसंबंधांची एक नवी जुळवाजुळव झाली.गावकुसाबाहेरील बहुजन समाज ,गरीब कुणबी मराठे या नवसत्ताधीशांच्या दावणीला बांधले गेले. शाहूंच्या प्रेरणेने चालू झालेल्या,  सामाजिक सर्वांगीण विकासाची आस लावणाऱ्या, या बहूजनांच्या चळवळीचे रूपांतर  मूठभर सरदारांच्या हातात एकवटलेल्या राजकीय सत्तेत आणि  त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक झुंडशाहीत झाले.

 नाही म्हणायला काही विचारी मंडळी विधायक कार्य उभे करत होती. विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभारलेल्या पहिला सहकारी साखर कारखाना व त्यातील मजुरांच्या मुलांसाठी उभारलेली शाळा हे त्याचे उत्तम उदाहरण. 

दुसरीकडे "लोकमान्यांची आणि शाहूंची कुंडली जुळली असती तर या महाराष्ट्राचं भाग्य काही वेगळं झालं असतं "असा मध्यम मार्गी विचार मांडणारं, सुसंस्कृत मराठा नेतृत्व यशवंतराव चव्हाण जे फुले, टिळक ,शाहू या लोकांचे सकारात्मक विचार पुढे घेऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल करावी यासाठी कटिबद्ध राहिले.

 जी गोष्ट इंग्रजांच्या राज्यात  सर्व क्षेत्रातील मक्तेदारी मुळे ब्राह्मण समाजाची झाली;  तीच गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळात  राजकीय आणि आर्थिक वर्चस्वामुळे कुलवंत सरदार आणि जमीनदार लोकांची झाली. बहुजन समाज हा फक्त वोट बँक झाला  व प्रगतीसाठी लागणाऱ्या शिक्षण वगैरे सुविधा त्याच्यापर्यंत पोचल्या नाहीत.

१९९० च्या दशकात  चालू झालेल्या "मंडल कमंडलच्या" राजकारणामुळे याची दिशा बदलली. मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार समाजातील अनुसूचित जाती ,जमाती, भटक्या विमुक्त जमाती, अन्य मागासवर्गीय लोक यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या यामध्ये आरक्षण मिळाले. सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर जो समाज गावकुसाबाहेर जीवन जगत होता त्याला मुख्य प्रवाहात येण्याची मोठी संधी प्राप्त झाली.सत्तेची फळे मुठभर कुलवंत सरदार व जमीनदार मराठे यांनीच चाखल्यामुळे  गरीब मराठा, कुणबी मराठा शेती सारख्या निसर्गाच्या लहरीवर असणाऱ्या व्यवसायातच अडकला.सहाजिकच सरकारी नोकऱ्या, डॉक्टर, वकील न्यायाधीश ,यासारख्या व्यवसायांमध्ये ब्राह्मण समाजाबरोबर बहुजन समाजातील हुशार तरुण दिसू लागले. स्मरणरंजनात रमलेला, बेभरवशाची शेती करणारा ग्रामीण गरीब मराठा तरुण या मध्ये कुठेच नव्हता. मग आता  या समाजाच्या विकासासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर पकडू लागली. 

लोकमान्यांप्रमाणे प्रमाणे आजच्या पिढीतील राजकारणी लोकांनी सुद्धा  लोकानुयायी भूमिका घेऊन  आयोग नेमून "मराठा समाज हा का आणि कसा मागास आहे" ते दाखवण्याचे प्रयत्न केले. मराठा संघटनांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी लाख लाख लोकांचे मोर्चे राज्याच्या विविध भागांमध्ये काढले. विशेषाधिकार वापरून तरी मराठा समाजास आरक्षण द्यावे यासाठी सरकारवर दबाव दिवसेंदिवस वाढू लागला. पूर्वी चळवळीमध्ये जे काम तमाशा आणि जलसे करत होते ते काम  आता मोर्चे आणि मराठा संघटनांचे मेळावे करत होते. पूर्वी अश्लील विनोद यांनी भरलेले जलसे वातावरणात विखार निर्माण करत  तर आता "मुख्यमंत्री साहेब आरक्षण मागतोय तुमची बायको नव्हे" अशा प्रवृत्ती ते काम चोख बजावत होत्या।

जातीची उतरंड नष्ट करण्यासाठी झालेली   वेदोक्ताची चळवळ असेल किंवा  आता "मागास बनवून आरक्षण द्या" यासाठी चाललेले आंदोलन असेल भरडला जातोय तो गरीब मराठा.

 त्याच्याकडे पाहून एवढेच म्हणावेसे वाटते

 कालाय तस्मै नमः !


संदर्भ :

"राजर्षी शाहू महाराज  आणि वेदोक्त प्रकरण "- उत्तम कांबळे 
"सहकाऱधुरीण "-अरुण साधू 

3 comments:

  1. सुंदर, विद्वत्तापूर्ण आणि गेल्यां १५० वर्षातिल राजकीय व सामाजिक स्थित्यतरांच विवेचन अभ्यासपूर्ण.

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर, सटीक, सूर्यप्रकशाइतके स्पष्ट, स्वच्छ, विवेचन.

    ReplyDelete

  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...