Saturday 29 February 2020

Image result for marathi bhasha logo   मावशीच्या  कचाट्यातील  "माय"मराठी 

भाषाशात्र्यज्ञांच्या मते  संवादचे माध्यम असणाऱ्या भाषांचे ४ भागात वर्गीकरण करता येते।  या भाषांची जर एक उतरंड पद्धतीने मांडणी केली  तर सर्वात तळाशी येते ती " बोली भाषा " ज्यामध्ये जगातील ९८% भाषा समाविष्ट होतात।  या परिघावरच्या भाषा जगातील १०% पेक्षा कमी लोक बोलतात। या भाषा छोट्या छोट्या समुदायात संवादासाठी वापरले जातात।  त्यानंतर नंबर लागतो तो काही प्रमुख " प्रादेशिक/राष्ट्रभाषा  यांचा ".  यामध्ये एखादा प्रदेश, त्यातील लोक यांची बोलण्याची , लिहण्याची , शाळेत शिकण्याची , काही प्रमाणात राज्य कारभाराची  भाषा ही समान असते।  तीच त्यांची सांस्कृतिक ओळख पण ठरते।  अशा भाषात  मराठी , गुजराथी  बंगाली   किंवा  कोरियन ,  जापनीज अशा भाषा येतात त्यांना " मध्यवर्ती भाषा " असे म्हटले जाते। यात १% भाषा अणि ५०% पेक्षा जास्त ती भाषा बोलणारे लोक अशी मांडणी असते।  त्यानंतर येतात त्या "राष्ट्रभाषा ". खण्डप्राय देश किंवा विविध देशात पसरलेले लोक ज्या एका समान धाग्याने जोडले जातात  ती  म्हणजे ही भाषा , ज्यामध्ये मग हिंदी फ्रेंच , जर्मन ,मलय , स्पॅनिश , रशियन  अणि इंग्लिश अशा  भाषांचा समावेश होतो।  या भाषा बहुतेक लोकांसाठी बोली किंवा  मातृभाषेनंतरची दूसरी भाषा असते। साधारण १० कोटिपेक्षा जास्त लोक ती भाषा बोलत असतात।  या उतरंडीवर सर्वात उच्च स्थानी येते ती "इंग्लिश ".  जागतिक संवाद , ज्ञानाची कवाड़े खुली करणारी  भाषा म्हणून ती आत्मसात करण्याकडे आपला कल असतो।  त्याला भाषाशात्र्यज्ञ "सर्वोच्च केन्द्रीकरणाची " भाषा म्हणतात। 

"प्रभो या एका खांबा वरी उभी , महाराष्ट्र द्वारका " असे लोकमान्य टिळकांना उद्देशून शाहिर गोविंद यांनी उद्धार काढले होते त्यात थोड़ा बदल करून " प्रभो या एका खांबावरी उभी , संवादाची द्वारका" असे जर आपण इंग्लिश बाबतीत म्हटले तर काही वावगे ठरणार नाही। 

माणूस म्हणून आपल्याला सर्वात जास्त मोठी भूक कशाची असेल तर ती आपुलकीची।  माणसामाणसात  आपुलकी निर्माण करणारे अनेक धागे असतात , काही कौटुंबिक असतात , कधी ते धर्म किंवा जाती-पोटजाती यावर आधारलेले असतात , पण सर्वात प्रबळ दुवा ठरतो तो म्हणजे "भाषा ". शब्द हा माणसाला लागलेला सर्वात मोठा शोध आहे। रामदास म्हणतात "आधी वंदु कवीश्वर। जे शब्द सृष्टीचे ईश्वर।" म्हणजे साऱ्या जगाला शब्दांनीच ईश्वरता किंवा वैभव बहाल केले आहे। "आहार , निद्रा ,भय अणि मैथुन " ही प्राणिमात्रांची लक्षणे  माणसाला पण लागू होतात  पण माणसाला  अजून एक देणगी लाभलेली आहे ती म्हणजे "शब्दांनी समृद्ध होत जाणारी भाषा " माणसाला जे जे जाणवते ते ते कळविण्याची शक्ती मुख्यत: शब्दशक्ती माणसाला लाभलेली आहे।  उपयुक्त व्यवहारासाठी , शिक्षणासाठी किंवा आनंदासाठी म्हणा  हे शब्द , त्यातून उमटणारे ध्वनि , होणारी भाषा निर्मिति  आपले व्यक्तिमत्त्व घडविते। जीवनाचे असंख्य सन्दर्भ एकेका शब्दाभोवती घर करून बसलेले असतात। कंप्यूटर, मोबाइल  किंवा कॅल्क्युलेटर  हे आता प्रत्येक घरोघरी असतात  असे असताना जर सहज मी इथे लिहताना म्हटले की " बे एके बे , बे दुणे चार ", ते वाचून होण्याच्या आधी निम्मे लोक मनात " बे त्रि क सहा " असे मनात म्हणाले असतील  सुद्धा  कारण हा एक पाढा  तुम्हाला जादुई शक्ति सारखा तुम्ही  जगाच्या पाठीवर कुठेही असा तुमच्या बालपणात घेऊन जातो। प्राथमिक शाळा , शाळा मास्तर , वर्गातील मित्र किंवा मैत्रीणि दिसायला लागतात।  हा साधा पाढ़ा तरल आठवणींची लहर मनात उमटून जातो।  आता दूसरे उदाहरण घ्या  आपल्याला जर कोणी थालीपीठ म्हटले की  काय  ते समजावून सांगण्याची वेळ येत नाही  कारण थालीपीठ या शब्दाच्या उच्चारात  रंग , रस , नाद , गंध , स्पर्श हे पंचम सुर मनात रुंजी घालायला लागतात।  कारण तो फक्त एक चवदार पदार्थ नसतो तर त्याच्या आठवणीने तुम्ही  वडिलोपार्जित घर , त्यातील  स्वयंपाक घर , थालीपीठ थापताना  होणारा आईच्या हातातील बांगड्यांचा आवाज , थालिपीठावर हलकेच ठेवलेला लोणी गोळा , त्या थालिपीठाचा सुटलेला खमंग वास , असे असंख्य आठवणीचे गाठोड़े उलगडत असता।  शेवटी माणूस म्हणजे अश्या असंख्य आठवणींचे गाठोड़ेच।  त्याला आपण मग संस्कृति म्हणतो। असे अनुभव आपल्यासारखे जर दुसऱ्या कुणाला आले तर तो लगेच आपला माणूस होतो। तो गट मग समान भाषिक गट होतो कारण त्या भाषेने समाजाला समान संदर्भ दिलेले असतात। 

ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे  शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानावर पडतात , त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसून ती प्राणाशी जोडलेली असते। शरीरातून रक्त वाहते तसे  आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहते।  तो प्रवाह थांबविणे अशक्य आहे  आईच्या दुधावर शरीराचे पोषण होते तेव्हा तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण होते  कारण केवळ देहाच्या पोषणाने भागत नाही , किंबहुना माणूस म्हणजे ज्याला मन आहे तो अशी जर मांडणी केली तर भाषा ही मनाचे पोषण करते।  ती मातृभाषा असते।  त्या भाषेबद्दल आपल्याला प्रेम वाटणे , मानवी जीवन समृद्ध करणारे लिखाण , ज्ञान , साहित्य , कला यांची निर्मिति जर त्या भाषेत होत असेल तर त्या भाषेबद्दल आपुलकी असणे साहजिकच। 

पुष्कळ संस्कृती  कालप्रवाहमध्ये पाचोळ्यासारख्या वाहून गेलेल्या आपण पाहतो। युद्ध होतात , विजेती राष्ट्रे आपली संस्कृति पराजित राष्ट्रांवर लादत असतात  त्याचा प्रभावी उपाय म्हणजे पराजित राष्ट्राची भाषा नष्ट करून आपली भाषा लादणे। आपली भाषा ही राज्यसत्तेची भाषा करायची अणि ती ज्याला येते तोच ज्ञानी अणि बाकी सर्व अडाणी असा समज लोकांच्या मनावर बिंबवायचा। विजेत्यांच्या भाषेचेच नव्हे तर त्यांचा आचार विचार , चाली रीती  यांचे अनुकरण करणे क्रमप्राप्त होते। चांगले मराठी बोलणारा  माणूस पण अडखळत का होईना पण इंग्लिश बोलण्याला प्राधान्य द्यायला लागतो।  साहेबांचे कपडे प्रिय वाटू लागतात  अणि पराजित मनाने जेत्यांच्या सत्तेला केलेला तो सांस्कृतिक मुजरा ठरतो।  आपल्याकडे साधारण हेच झाले। 

महाराष्ट्रात आज मराठी पेक्षा इंग्लिशला जास्त मान आहे स्वातंत्र्यपूर्वी इंग्रजी राज्यात इंलिश राजभाषा होती  ती शिकण्याची सक्ती होती म्हणुन असेल पण तिला  न्याय मिळत होता।  पण आता स्वतंत्र भारतात किंवा महाराष्ट्रात तशी सक्ती नाही। पण इंग्लिशची किल्ली हातात असेल तर प्रगतीची अनेक दारे खुली होतात हे लोकांनी ओळखले आहे।  श्री पु भागवत एकदा म्हणाले होते की  "खुद्द महाराष्ट्रात ह्या इंग्लिशचे आकर्षण इतके वाढले आहे की पुढील शतकात मराठी कुठलेही साहित्य वैगरे नसलेली बोलीभाषा होऊन बसेल "

त्या मध्ये बऱ्याच अंशी तथ्य आहे कारण भाषा ही आचार विचारात बदल करते , इंग्लिश सोडून दूसरी भाषा येत नसेल तर सगळे व्यक्तिमत्त्व इंग्रजांची नक्कल करण्यात जाते।  ही नक्कल आता आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसते।  लहान मुलांची गाणी असोत किंवा सण-समारंभ असोत , आई बाबांचे उल्लेख "My Folks " असा होतो तर  दसरा दिवाळी पेक्षा "सांता क्लॉस " हा राम /कृष्णाचा अवतार असल्यासारखे "Christmas "चे प्रस्थ वाढते आहे।  "Halloween "ची "थीम पार्टी " साजरी करताना "होळीची " बोंब "Old Fashion " वाटायला लागली आहे। 

प्रत्येक बाबतीत फक्त आर्थिक नफा हे एक ध्येय असेल तर आधुनिक यंत्र अणि  ज्ञानाधारित तंत्राच्या युगात सगळ्याच संस्कृति सपाट होऊन आपापली वैशिष्ट्य गमवून बसल्या आहेत। हा आघात इथेच संपत नाही , भाषिक शब्द समुहावर पुढील चढ़ाई असते। सावरकरांनी १९२० मध्ये "मराठी भाषा शुद्धिकरण " या मथळ्याखाली केसरीमध्ये विपुल लेखन केले  अणि त्यामध्ये बऱ्याच इंग्लिश शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द निर्माण केले मग ते "विदूयतदहिनी "असेल किंवा "क्रमांक , दिनांक , पटकथा , दिग्दर्शक पर्यवेक्षक " इ।  अणि त्यांनी सांगितलेले धोका खरा ठरला तो म्हणजे  " मराठी बोलताना दुसऱ्या भाषेतील शब्द वापरणे म्हणजे घरातील सुन्दर सोन्याची वाटी फेकून देऊन चीनी मातीची भांडी वापरण्यासारखे आहे "

आज सर्रास आपण चीनी मातीची भांडी वापरत आहोत अणि ती कशी मस्त आहेत हे स्व:तला पटवून देत आहोत। 

"अमृतातेंहि पैजा जिंकणाऱ्या " मराठीतून ज्ञानदेवांनी "हे विश्वची माझे घर "अशीच व्यापक मांडणी केली आहे।  त्यामुळे इंग्लिश मावशीने माय मराठीचा गळा घोटला असे उथळ निष्कर्ष  कुणाच्याच फायद्याचे नाहीत।  वर  लेखात मराठीचा उल्लेख करताना  भावना , आठवणी अशा मार्गाने जास्त येतो  त्या अर्थाने ती स्मरणरंजनाची भाषा ठरते।  अणि आजच्या "ज्ञानाधारित  अर्थव्यवस्थेत (Knowledge based  Economy) इंग्लिश ही ज्ञानोपासनेची भाषा म्हणून पुढे निघून जाते।  उदाहरण घ्यायचे झाले तर ज्ञानेश्वरांनी "गीतेचा "सारांश मराठीतून मांडला ती म्हणजे "ज्ञानेश्वरी ". त्याकाळी गीता हा ज्ञानोपासनेचा ग्रंथ होता तो ज्ञानेश्वरांनी सर्वांना समजावला जावा म्हणून मराठीत आणला , तसे आजच्या काळात तंत्रज्ञान , कृत्रिमप्रज्ञा , माहिती तंत्रज्ञान हे मराठीत समजावून सांगण्याची आवश्कयता आहे।  जो पर्यन्त  ती ज्ञान भाषा होत नाही तो पर्यन्त  इंग्लिश च्या कचाट्यातून तिचे सुटणे  अवघडच।  कारण तसे झाले नाही तर भाषेबरोबर संस्कृति अणि आचार विचार पण विस्मृतीत जाण्याचा धोका आहे।  त्या दृष्टीने प्रयत्न चालू झाले आहेत।  अच्युत गोडबोले असोत  भूषण केळकर असोत  कला , क्रीड़ा विज्ञान  या पासून ते अगदी "इंडस्ट्री ४.० " पर्यन्त गोष्टी लोकांना समजाव्यात यासाठी वेगवेगळे उपक्रमराबवित आहेत  , पुस्तके लिहित आहेत।  हे प्रयत्न वाढविणे हीच काळाची गरज आहे। 

तेव्हाच आपण अभिमानाने म्हणू शकू 

"लाभले आम्हांस भाग्य , बोलतो मराठी 
   जाहलो खरेच धन्य      एकतो मराठी /"

नुकत्याच झालेल्या मराठी दिनानिम्मित जे सुचले ते तुमच्यासमोर मराठीतून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न। 
मराठी दिनाच्या शुभेच्छा। 



No comments:

Post a Comment

  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...