Sunday 27 January 2019

Line Cross करनी है क्या?

परवाच "नेटफ्लिक्स " वर "BAAZAAR" हा  हिंदी चित्रपट पाहिला। चित्रपटाची कथा ही तशी  टिपिकल हिंदी स्टाइल ची।  अलाहाबाद( योगींच्या  उत्तरप्रदेशमधील "प्रयागराज")  सारख्या छोट्या  शहरात वाढलेल्या  पण आभाळाची स्वप्ने पाहणारा "रिज़वान अहमद" हा तरुण  आणि  त्याचा खुदा म्हणजे "शगुन कोठारी ".  शेयर मार्केट व वित्त दुनियेचा जादूगार। डील मेकिंग आणि वेगवेगळ्या कंपनीच्या समभागांमध्ये  गुंतवणूक याच्या जोरावर प्रचंड पैसा नाव आणि दहशत (इज्जत नाही ) कमावलेला।  जीवनाला "१०० मीटर स्प्रिंट रेस " सारखे जगणारा आणि प्रत्येक व्यवहार  जिंकण्यासाठीच करताना साम दाम दंड भेद याचा खुबसुरतीने उपयोग करुन घेऊन फक्त यशश्वीच ठरलेला खिलाडी. आपले स्वप्न साकार करण्यासाठी हा होतकरू तरुण काय करतो , आपल्या खुदाला कसा भेटतो, त्याची इच्छापूर्ती होते की भ्रमनिरास , हा प्रवास म्हणजे "BAAZAAR".  मला चित्रपट आवडला।  सैफ अली खान ने "शगुन कोठारी " छान ताकदिने उभा केलाय( मला नेहमी वाटते की हा  नट कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ न शकल्याने " खाना"वळीच्या( खास  नाना पाटेकरांचा शब्द )  उतरंडीत मागे राहिलेला  , असो त्याविषयावर पुन्हा कधीतरी! ). रिज़वानला  मदत करणाऱ्या लोकांमध्ये  राधिका आपटेने रंगविलेल्या पात्राचे( प्रिया राय ) विशेष महत्व आहे। आपल्या खुदा बरोबर काम करण्याची संधि  की अलाहाबाद चे परतीचे  टिकट या व्दंव्द रेषेवर उभ्या असणाऱ्या रिज़वानाला प्रिया जो प्रश्न विचारते तो या चित्रपटाचा हाय लाइट आहे।  " Line Cross करनी है क्या ?"   

चित्रपट संपला। "विलेपार्ले उतरने वाले आगे आयो ", अशी हाक आली व मी बस मधून उतरून घरी गेलो।  एक प्रश्न मनात घर करूँन  राहिला होता तो म्हणजे " Line Cross करनी है क्या ?"

ती रेषा (Line) मला  जगण्याच्या  रणांगणावर  युद्धनीति( Strategy) अणि नीतियुद्ध ( Ethics, Compliance etc.) या मधील सीमारेषा वाटत आलेली आहे।  जीवन आनंदी करण्यासाठी माणसाने जो हा अखंड यज्ञ  चालविला आहे त्यात आहुती (Sacrifice) ही "तत्वांची (Principles) की स्वप्नांची (Dreams)" हे ठरवि ण ा री "Line of Control" वाटत आली आहे।

जानेवारी महिना सुरु झाला की राजकारणातील आणि  व्यापार ,अर्थकारणातील धुरीण  "दावोस " या स्विज़र्लंडमधील ठिकाणी जमतात।  पुढील वर्ष जगाच्या अर्थकारणासाठी कसे असेल , कुठला देश विकासाचा केंद्रबिंदु असेल किंवा कुठला देश, त्याची धोरणे जागतिक अर्थव्यवस्थेस अणि त्याच्या वाढीस खो घालु शकतील , माहिती & तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे बदल मानवी जीवन आणि रोजगार या गोष्टीशी कसे निगडित आहेत। अश्या वेगवेगळ्या विषयांवर परिसवांद असतात।   दरवर्षी भरणाऱ्या या वारीत वेगवेगळ्या तत्वप्रणालीचा  (ideology) बुक्का लावलेले शेकडो वारकरी आपली विचाररूपी कीर्तने करीत असतात।

भारताच्या बाबतीत बोलायचे झाले  तर  या  वार्षिक वारीतुन  आपल्या हाती लागले ते  आपल्याला खुप काही विचार करायला लावणारे आहे।  प्रथम  आनंदी गोष्टीने चालू करू।  २०१९ मध्ये भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा वेग हा जगात सर्वात जास्त म्हणजे  प्रतिवर्षी ७.५ %  इतका राहील।  धोरण सातत्य(Policy Continuity) जर राखले तर हाच वेग पुढचे काही वर्ष क़ायम राहण्याची दाट शक्यता आहे । हा देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे त्यामुळे याचे कौतुक थोड़े जास्तच।  पण विचार करायला लावणारी गोष्ट पुढे चालू होते।  भारतात मागील वर्ष निर्माण झालेल्या एकूण संपत्ती पैकी  देशातील ९९ % लोकांची संपत्ती  ३% वाढली अणि १% लोकांची सम्पति ४० % वाढली।  बर या विषमतेचा चटका जर अजून प्रखर करायचा असेल तर  थोड़े आकड्यात बोलूया।  २०१८ मध्ये १% भारतीय जनतेने  कमविलेल्या संपतीचा आकड़ा आहे  ३० लक्ष करोड़  आणि फेब्रुवारी मध्ये सादर होणाऱ्या मायबाप सरकारच्या अर्थसंकल्पचा आकड़ा आहे  २५ लक्ष करोड़। म्हणजे मनात आणले तर हे लोक सरकारला देश चालवायला लोन देऊ शकतात।  थोड़ी गंमत अजुन बाकि है मेरे दोस्त ! १% लोकांचे जर आणखी वर्गीकरण केले तर ऐसे दिसते की ९-१० लोकांची एकूण संपत्ति ६५ कोटी भारतीय लोकांच्या एकूण संपत्तिएवढी आहे।  वर्गवादाचा लढा जर कागदावर मांडायचा झ ाला तर तो ९ -१० विरुद्ध ६५ कोटी असा असेल।  तो चालू होणे हे पहिल्या आनंदी बातमीला घातक आहे.

या अर्थकारणाचे सामाजिक कंगोरे जर तपासले अणि या आर्थिक विषमतेचा जळजळीत पुरावा जर पाहिजे असेल तर आजच्या समाजकारणाकडे बघावे लागेल।  शेतकरी खुश नाही कारण त्याच्या मालाला चांगला ( माफक अपेक्षा काय तर भाव  हा निर्मितीच्या भावापेक्षा जास्त पाहिजे  ) भाव मिळत नाही।  कर्जमाफीने ही समस्या सुटेल असे  वाटत नाही  अणि तो एकच उपाय असेल तर सरकारलाही वर सांगितल्याप्रमाणे देश विकायला काढण्याखेरीज पर्याय नाही।  विकास हा  खर्चकपांत , यांत्रिकीकरण , उत्पादनक्षमता  या त्रिसूत्री वर आधारित आहे।   रोजगार निर्मिती जरी होत असली तरी ती पाहिजे त्या प्रमाणात आणि पाहिजे त्या किमतिला होताना दिसत नाही आहे।  यांत्रिकीकरण (Automation), कृत्रिम प्रज्ञा (Artificial Intelligence) या मुळे विकासदर  रोजगार वाढीस पूरकच ठरेल ही शक्यता धूसर आहे।

शेतीच्या प्रश्नाने ग्रामीण भारत उसासे टाकतों आहे  तर बेरोजगारीच्या चिंतने  नागरी तरुण ग्रस्त आहे।

 यातून "अस्मितांचे हुंकार  ", "जातिपातीचे राजकारण " आणि  "भावनांना साद घालणारी एकांगी टोकाची भूमिका"  आणि सर्व रोगावरचे एकच औषध  म्हणजे  " आरक्षण " असा समाजकारणाचा बाज बनला असताना " तडजोड ", " विसंवाद असताना चर्चा करण्याची मानसिकता " हा गुण  न रहता दुबलेपणाची निशानी झालेली आहे।

बर आरक्षण हा उपाय जर आपण योग्य ठरवून  काम चालू केले तरी परिस्थिती असी आहे की  रोजगार निर्मितीत सरकारी वाटा २% इतका  आणि भरतीची प्रक्रिया पण बेभरोश्याची।  अश्या वातावरणात आरक्षण म्हणजे "ओसाड गावची पाटीलकी नव्हे काय  ?"  खासगी उद्योगात  आरक्षण  हा  शब्द जरी उच्चा रला की  वरचे "दावोस" रूपी वारीतील वारकरी नाराजीचा सूर अळवतात।

अश्या वातावरणात "Line Cross करनी है क्या " हा यक्षप्रश्न  बनतो आहे।  इतिहास साक्ष आहे की जेव्हा जगण्याची लढाई लढली जाते तेव्हा युद्धनीतिच ( Strategy)  नीतियुद्धा वर  ( Ethics, Compliance etc.) हावी होते।  स्वप्नांसाठी(Dreams)  आहुती (Sacrifice) ही "तत्वांचीच  (Principles) दिली जाते।  विवेकानंद म्हणायचे की " धर्म हा भुकेल्यासाठी नाही "(Religion is not for empty Stomach).त्यात थोड़ा बदल करून असे म्हणेन की "तत्त्व ही भरल्या पोटीच बोलण्याची गोष्ट आहे। "

थोडक्यात काय सगळे संपले आहे की काय मुळीच नाही।  आपला दैदिप्तमान इतिहासच वाटाडया   होऊन आपणास मार्ग दाखवेल।

थोड़े मागे इतिहासात डोकावले तर याच सीमारेषेच्या दोहोबाजूस " व्यक्तिगत महत्वाकांक्षा " आणि " विश्वबंधुत्व " यांची रस्सीखेच चाललेली दिसून येईल। "  अवघे विश्वचि माझे घर " ऐसे म्हणत " Global Citizen" चा नारा देणारे संत ज्ञानेश्वर  आणि "अत्यंत क्रूरतेने साम्राज्य विस्तार करणारा विधिनिषेधशुन्य  "अल्लाउद्दीन खिल्जी " हे एकाच काळातले।

" एम्परर ऑफ़ वर्ल्ड " च्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेने  जगाला विनाशाकडे नेणारे महायुध्य  लादणारा  " हिटलर " अणि "  स्वातंत्र ,समता , बंधुता , ( विविधेतेत )एकता   यांचा संदेश देणारा भारतीय स्वातंत्रसंग्राम " हे पण समकालीनच । स्वातंत्रसंग्रामाची सूत्रे "टिळकांकडून  गांधीकडे" गेल्या नंतर " व्यक्तिगत हेवेदावे  न मानता स्वातंत्र हे प्रथम उदीष्ट मानुन कार्य करणे आणि आपला वेगळा विचार व्यक्तिव्देषाच्या पातळीला जाउन  न देता  "केसरीतून " सम्पादकीयात   मांडत राहण्याचा " सुवर्णमध्य " साधणारे  न. ची. केळकर याच काळातले । " म्हटले तर बरोबर म्हटले तर चूक " हा  खास केळकरी वाक्प्रचार। तडजोड ही दुर्बलता नसून वाटा घाटी तील अस्त्र आहे  हे सुचविणारे ! आपल्या मनाप्रमाणे  झ ा ले नाही तरी "Line Cross" न करता मार्ग दाखविणारे कुणीतरी होते ही आशा पल्लवित करणारे  .

तिसरे म्हणजे " महाराष्ट्राचे पहिले मुख़्यमंत्री  श्री यशवंतराव चव्हाण साहेब ".  " बेरजेचे राजकारण " हा मराठीला त्यांनी बहाल केलेला शब्द।  राजकारण हे सर्वसमावेशक करण्यासाठी केलेला प्रयत्न  जो आज खुप जास्त गरजेचा  आहे।  अस्मितांचे हुंकार  ,जातिपातीचे राजकारण अणि भावनिक साद ही खुप गो ड वाटली तरी  अंतिमता हाती वजाबकिच येते हे दर्शवताना यशवंतराव आठवतात आणि मनाला आधार मिळतो की "बेरजेची भाषा करणारा कोणी तरी आपल्यातलाच होता  व पुढे पण होऊ शकतो।

"Line Cross करनी है क्या" हा प्रश्न विचारत फिरणाऱ्या व "Line Cross करनी है क्या"हा प्रश्न पडलेले अनेक तरुण तरुणी  असलेल्या या देशात "विश्वबंधुत्व", "सर्वसमावेशक विकास ", सुवर्णमध्य" साधण्याची मानसिकता असणारे धुरीण पण आहेत हीच काय  ती बेरजेची बाजू।



<a href="http://www.marathibloggers.net/" target="_blank"><img alt=" मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!" src="http://goo.gl/YckhY"></a>

Discover latest Indian Blogs
<a href="https://www.blogadda.com" title="Discover latest Indian Blogs"> <img src="https://www.blogadda.com/images/blogadda.png" width="80" height="15" border="0" alt="Discover latest Indian Blogs" /></a>



Saturday 19 January 2019

     द्रोणाचार्य  & आईपीएलची कार्टी !  


जानेवारी  महिना चालू झ ाला की  मजसारख्या परदेशी वित्त संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना वेध लागतात ते सरत्या वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन येणाऱ्या वर्षासाठी बाह्या सरसावून जोमाने ठरलेल्या ध्येय धोरणांनुसार कामाला लागण्याचे । सरत्या वर्षाच्या कामगिरीनुसार कमी अथवा अधिक होणाऱ्या पगार वाढीवर  मकर संक्रांतीचे तिळगुळ अणि गुळाची पोळी यांची गोड़ी कमी अधिक होते. जास्त पगारवाढीचा आनंद  किंवा कमी पगारवाढीसाठीचे उसासे  जानेवारीच्या गुलाबी थंडीत अनुभवणे  आता नित्याचेच। 

पण या वर्षी थोड्या अधिक कडाक्याच्या अणि जास्त लांबलेल्या  थंडीत बोचणाऱ्या तश्या बऱ्याच घटना आजूबाजूला घडल्या अणि नकळत  मनावर खोल ठसा  उमटुन  गेल्या।  या बोचणाऱ्या गोष्टीमध्ये दोन  ठळक  उल्लेख कराव्या अश्या घटना  म्हणजे  " रमाकांत आचरेकर " सरांचे निधन  व " Koffee with Karan" या गप्पांच्या (?) कार्यक्रमामध्ये हार्दिक पंड्या याने उधळलेली मुक्ताफळे !

भारतामध्ये माणूस  आयुष्यात   कोणीही असो  एक कुळधर्म  हा नित्यनेमाने पाळत  असतो। त्या कुळधर्मा चे  नाव म्हणजे "क्रिकेट ".  क्रिकेट हे वरकरणी  जरी ब्रिटिश राज्यसत्तेचे अपत्य असले तरी  हा  खेळ ब्रिटिशांना देखील खास भारतीय मातीत भारतीयांसाठीच सुचलेला असावा इतका तो या देशाच्या मातीत  व लोकांच्या मनात रुजलेला आहे।  या कुळधर्माचे कुळाचार म्हणजे क्रिकेटच्या होणाऱ्या मैचेस. त्या  पाहताना तन -मन -भान हारपून जाणाऱ्यां ची  संख्या निश्चितच कमी नाही इतका की हा खेळ मैदानी न राहता भावनिक कधी झ ाला हे पण कळले नाही। सामन्याच्या निकालानंतर सुख दुःख च्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या कुळधर्मीयांचे कुळदैवत म्हणजे अर्थातच क्रिकेट खेळणारे खेळाडू आणि देवालये  म्हणजे  क्रिकेटची स्टेडियम्स। 

जसे हिन्दू धर्मामध्ये अनेक ईश्वरवाद असताना देखील काही देवतांचे स्थान "First Amongst Equals" म्हणतात तसे असते ना  त्या प्रमाणे  या कुलदेवतांचे।    क्रिकेट रूपी  धर्माच्या कुलाचाराचे  पालन  करताना प्रामुख्याने  कुलदेवताकडे जेव्हा मोर्चा वळतो तेव्हा प्रत्येक पिढीनुसार कुलदैवत बदललेले आपण पाहतो। हज़ारे ,मर्चंट ,मांजरेकर , पतौडी , वाडेकर , गावस्कर , कपिलदेव  असा प्रवास करत करत  तेंडुलकर ,द्रविड़ ,गांगुली ,धोनी  ते कोहली पर्यंत आपण  येऊन विसावतो। 

मी  ज्या  पिढीचा प्रतिनिधि आहे त्याचे कुलदैवत  हे  निश्चितच एक  अणि एकच होते।  ते म्हणजे "सचिन  रमेश  तेंडुलकर। "कारण  या देवाने जवळ जवळ दोन दशके आपल्या खेळाने आम्हा क्रिकेट धर्मीयाना मनमुराद आनंद तर दिलाच त्याबरोबर  रोजच्या  जगण्याच्या कटकटीतून ताजेतवाने होण्यासाठी विरंगुळा  पण मुबलक पुरविला। 

या कुलदेवाच्या जडणघडणीचे कार्यक्षेत्र म्हणजे "दादरचे शिवाजी पार्क " व  कुलदेवाचा मूर्तिकार म्हणजे " रमाकांत आचरेकर  सर ".  मातीच्या गोळ्याला आकार देऊन उत्तम शिल्प निर्माण करणाऱ्या शिल्पकाराप्रमाणे या माणसाने " सचिन रमेश तेंडुलकर " या वंडरबॉयला शब्द:श घडविले।  व  या शिल्पाने देखील  आपल्या  अंगभूत प्रतिभेने  आणि सरांच्या  मार्गदर्शनरूपी घडळावळीने  साऱ्या जगाला वेडे केले। 

आचरेकर सर यांनी  क्रिक्रेट मैदाने गाजविणाऱ्या नररत्नांची खाणच  उभी केली।  चंदू पंडित , प्रवीण अम्रे , अमोल मुजुमदार , वसीम जफ़र , विनोद  कांबळी  अणि अर्थातच सचिन तेंडुलकर  या त्यांच्या शिष्यांनी  रणजी , अंतरराष्ट्रीय  टेस्ट  अणि  एकदिवसीय सामन्यात भारताची पताका सदैव उंच फड़कत ठेवली। 

यशाची शिखरे पादाक्रांत करताना लागणारी शिस्त , संयम , क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचे तर " Match Practice", " Practice Session (सराव शिबिरे ), मानसिक कणखरपणा (Big Match Temperament) यावर अधिक लक्ष्य केंद्रित व्हावे  म्हणून सरांचा सगळा भर हा  जास्तीतजास्त मैच खेळण्यावर असायचा।  नैसर्गिक शैली ( जरी ती पारंपारीक  क्रिकेटच्या टेक्सटबुकमध्ये बसत नसेल तरी )कायम ठेवून खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे तंत्र म्हणजे  आजची "Focus on your Core strengths, to develop yourself into a formidable Force" ही "Management Philosophy" च नव्हे काय. हे करत असताना फाजिल कौतुक  हे सरांनी टाळलेच।  सराव  सामन्यात मुलगा लवकर बाद झाला तर सर स्वःत  त्याला स्कूटरवर बसवून दुसऱ्या ग्राउन्डवरील सामन्यासाठी घेऊन जायचे  जेणेकरून जास्तीतजास्त  सराव होईल। 

आयुष्यात  प्रत्येकवेळी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात असे नाही पण त्या तश्या घडल्या नाहीत तर हताश/निराश न होता प्रयत्नवादी बनून धीराने संकटांचा सामना करत विजयपथाकड़े आगेकुच  करायची असते।  प्रत्येकवेळी मुठी वळवाव्यात असे वाटत असताना हाताची घडी घालण्यातच धन्यता मानावी लागते।  पण  अश्या परिस्थितीत नेटाने  काम करत " मुठी वळु शकतील " असा आत्मविश्वास देणारा नंदादीप  असणे महत्त्वाचे असते।  मला वाटते त्या नंदादीपाचे  मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "आचरेकर सर। ".  

एखाद्या व्यक्तीने  एक-दोन स्पर्धात्मक परीक्षेत  किंवा गा ण्याच्या स्पर्धेत , खेळाच्या सामन्यात  यश मिळविले  की लगेच " उगवता तारा ," " लिटिल  चैंप्स " किंवा " आल राउंडर " अशी बिरुदे लावण्या च्या काळात    " १००  International Centuries & १००००  Test / १०००० one Day Runs" केलेला  जगप्रसिद्ध फलंदाज सरांच्या"Well-Played" या  कौतुकांच्या शब्दांसाठी आसुसलेला असायचा।  वर सरांना कोणी विचारले की सर म्हणायचे " एवढेच , अजुन केलेच  काय आहे त्याने , बराच लांबचा  पल्ला गा ठा यचा आहे ".  हे उत्तर  एकाचवेळी "खवचट पणा " आणि "शिष्याच्या प्रतिभेवरचा विश्वास "या सीमारेषेवर फिरणारे असायचे।  कदाचित हाच गुण त्यांच्या शिष्यांना जग जिंकण्यासाठी  सर्वस्व  पणाला लावण्याची जिद्द द्यायचा। 

याच तालमी मुळे असेल पण  जेव्हा  " खा उ  जा " ( खाजगीकरण , उदारीकरण , जागतिकीकरण ) संस्कृति  भारतामध्ये आली  आणि फोफावाली , तेव्हा  क्रिकेटच्या " खेळाचा " गेम  झाला।   भरपूर पैसा , जाहिरातीची उमेदवारी(endorsements)  या जोरावर क्रिकेटपटटूची  कोटीच्या कोटी उड्डाणे  चालू   झाली।  तेंडुलकर , कांबळी   ही त्या काळाची सर्वात ठळ कपणे  आठविणा री जोड़ी ("Nothing Official About It! म्हणून पेप्सिच्या जाहिरातीने घातलेला धुमाकुळ आ ठ वा ). , क्रिकेटच्या मैदानावर पण चांगलाच पराक्रम गाजवत होती। 
 पुढे क्रिकेट  हा  खेळा बरोबर एक " Event" पण झा ला।  याच  वृक्षा ला लागलेले फळ म्हणजे " Indian Premier League(IPL)."

साधारण याच काळात हिंदी सिनेमा पण कात टा कत  होता।  "कुछ कुछ होता है " म्हणत  भावनिक अणि कौटुम्बिक घडामोडींवर आधारित चकचकित सिनेमा आकारला येत होता।  काळाची पावले चंगळवादाकडे  अणि जागतिकीकरणाच्या वाटेवर चालली होती।  बरीच लोक नाके मुरडत असताना काळाची पावले ओळखुन  सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात एक तरुण उतरला होता।  त्याचे नाव " करण जोहर ".  आजच्या सिनेमात सहजतने आढळणारा " जाहिरातीचा भडिमार (Product placement) किंवा "associated marketing tie up"  याची मुहूर्तमेढ रोवली ती या तरुणच्या चित्रपटाने , "कुछ कुछ होता है" ने।  मुलांना लहान न समजता त्यांचे विश्व समझाऊंन घेऊन  त्यावर आधारलेले जाहिरात विश्व सुरु झ ा ले। 

तेव्हा हा करण जोहर जेव्हा "Koffe with Karan" या  कार्यक्रमासाठी दोन तरुण  व प्रतिभावान क्रिकेटपटूंना  बोलावितो याला महत्व दिले पाहिजे।  अर्थात कार्यक्रमाची पूर्वपीठिका लक्षात घेता ही मुलाखत गप्पांपेक्षा 3G( Gossip, Glamour & Grandeur) च्या मार्गाने जाणार हे ओघाने आलेच।  पण या मुलाखतीत चौथ्या G ( Girls) वर जी  प्रश्र -उत्तरे  आणि मुक्ताफळे उधळली गेली  ती  पाहता ह्या  4G Network ने  प्रेक्षकांच्या मनाची Range काही पकडली नाही।  तरुण असताना बंडखोर असण्यात काहीही चूक नाही। तारुण्यात रगेल आणि रंगेल असणे पण एक वेळ चालेल।  अंगात धमक असेल तर मस्ती जरूर करावी।  पण त्या रंगेलपणाची  जाहीर  वाच्यता करुन  "झाकली मूठ रीति च आहे " हे दाखवण्याचा हुंबपणा कशाला। 

मला खटकलेली एकच गोष्ट म्हणजे हे जे काही घडले ते क्रिकेटच्या कुळाचारला धरुन  नाही। क्रिकेटपटू हे लोकांसाठी आइडल असतात। सचिन आम्हाला "उतु नका मातु नका /घेतला वसा टा कू नका" असे  म्हणत जगण्याचे सूत्र सांगतो. तर धोनी  आम्हाला स्फूर्ति देतो की "छोट्या गावात जन्माला येऊन सुद्धा आभाळाची स्वप्ने बघता येतात। प्रतिभेने अणि प्रयत्नाने ती  सत्यात उतरवता येतात ". इ कडे  विराट  त्याच्या नैसर्गिक आक्रमक अन्दाजामध्ये जणू सांगतो आहे " आहात कुठे , चला जग जिंकूया ". दुर्दैवाने  हार्दिक अणि राहुल यांच्या कडून त्यांच्या बैडरूम मधील कौश्यल्याखेरीज घेण्यासारखे काहीच नाही  असे  वाटते। 

आता  BCCI, तरुण क्रिकेटपटूसाठी "Sensitization Session" घेणार  आहे त्यातून या तरुणांना  पैसा , प्रसिद्धी कशी हाताळायाची  आणि माध्यमांबरोबर संवाद कसा करायचा याचे धड़े देण्यात येतील।  काही आठवले का वाचकहो , " LIFE Coach" नेमणार आहेत। 

खरच आचरेकर सर ! तुमच्या सारख्या "LIFE Coach" ला  भारत कायमच मिस करेल।  तुमच्या स्मृतीस शत:श प्रणाम !


Saturday 12 January 2019

| असा हास्यगंधर्व  आता न होणे | 



"भाई: व्यक्ति की वल्ली"  हा  चित्रपट गेल्या आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला। पु. लं ची पुस्तके , वेगवेगळया सभा,संमेलने  येथील भाषणे , नाटके , "व्यक्ति & वल्ली " मधील आपल्यासारखाच दिसणाऱ्या  /चालणाऱ्या  लोकांचे  केलेले  मार्मिक टिपण ,अशा साहित्यमेव्यावर जगणाऱ्या माझ्यासारख्या पु.ल भक्तांसाठी (चाहता या  मराठी शब्दासाठी  पर्यायी  व प्रभावी  म्हणून भक्त म्हणालो ) हा  चित्रपट  म्हणजे मेजवानीच।  आम्ही भक्तसम्प्रदायतले असल्यामुळे या भगवंतावरच्या चित्रपटाला पहिल्या खेळाला वर्दी लावली। आजपर्यंत जे आपण वाचले , ऐकले  ते आता पडद्यावर प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून प्रचंड उत्साही होतो।

मला  सांगायला अणि लिहायला अतिशय आनंद होतो आहे की चित्रपटात तो सुवर्णकाल , ते क्षण  मी अनुभवले  खुप मौज आली।  महेश मांजरेकर , सागर देशमुख  अणि विक्रम गायकवाड़  व चित्रपटाच्या पूर्ण टीमचे मी मनापासून अभिनन्दन करतो  की तुम्ही आम्हाला आमच्या भगवंताचे दर्शन घडविले। 

चित्रपट पाहून घरी परतल्यावर त्याचा प्रभाव , त्यातील दिग्गजांची सांगीतिक मैफिल , पु.ल -सुनीताबाई यांचा 
दैनंदिन संसार , इतर पात्रांबरोबरचे प्रसंग हे मनात घर करून गेले। 

आपल्याकडे एखाद्या माणसाला आपण देवस्थानी मानले की मग भक्तांसाठी गोष्ठी खुप सोफ्या होतात कारण देवस्थानबरोबर त्या माणसाच्या व्यक्तिरेखाटनाची चौकट अधिक कड़क होऊन जाते ।  त्याने वैयक्तिक जीवनात अमुक अमुक प्रकारे वागले पाहिजे , सार्वजनिक वावर साकारण्यासाठी /दाखविण्यासाठी एक नियमावली आपसूक उभी राहतें।  हे करताना आपण  एक गोष्ट विसरतो (किंवा सोयीस्कर दुर्लक्ष करतो ) की थोर माणसे रोजच्या आयुष्यात सर्वसामान्य माणसांप्रमाणे असतात  व  कर्तॄत्वाच्या क्षणी / कसोटीच्या रणांगणावर सामान्यांपेक्षा अधिक स्पूर्तिने , प्रतिभेने जीवनाला सामोरे जातात  व थोर होतात। 

या एकाच गोष्टीसाठी  मला  श्री. मतकरी (लेखक ), श्री  मांजरेकर (दिग्दर्शक ) यांचे अभिनन्दन करावेसे वाटते।  पु.ल या  वल्लीवरील सिनेमात  पु.ल  या व्यक्तीचा छान परिचय (देवस्थानाच्या चौकटीचे  भान ठेऊन पण नियमांना बाऊ न  करता  )करुन दाखविले। 
पु.ल , त्यांचे कुटुंब , आईबरोबर  चालणारी  थट्टा मस्करी , कॉलेजमधील  गमती जमती। मित्रांबरोबर घालवलेले अवखळ क्षण।  सुनीताबांईबरोबरचे असलेले नाते हे छान पडद्यावर उलगडून दाखविले।   
कुमार गंधर्व , भीमसेन जोशी , वसंतराव देशपांडे अशा मातब्बर मंडळींबरोबर झालेल्या अनेक मैफिली कशा असतील याची झ लक  याची देही याची डोळा पहायला मिळाली।  

समाज  माध्यमांमध्ये काही प्रतिक्रिया उमटल्या की  छे !  दारू पिणे  , सिगारेट ओढ़णे . हे कसे  काय दाखवले आहे।  इथे देवत्व  बहाल केल्यानंतरची  जी चौ कट  आपण उभी करतो त्याच्या नियमांच्या घोळ दिसतो।  जीवनाचा चौ फेर आस्वाद घेणाऱ्या मुसाफिराची गोष्ट ऐकताना या गोष्टी दाखविल्या तर ते "connoisseur" चे celebration असेल,  "बेवड्यांची  संस्कृतीचे "उद्दातीकरण नक्कीच  नाही।  तर या  संदर्भात टिपं गाळणे  ,माझ्या दृष्टीने निरर्थक आहे । आजची तरुण पिढी या सर्व गोष्टी सभोवताली पाहते आहे।  काय अनुकरण करायचे  व काय  टाकायचे  याची विवेकबुद्धी त्यांच्याकडे नाही व त्यांच्या (बाल )मनावर  परिणाम होईल असे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल। 


पूर्वीपासून कलवंताचे खासगी जीवन , त्यांचे  राहनीमाण , त्यांचा मदिरेकडे असणारा कल  याची दबक्या स्वरात चर्चा व्ह ायचीच।  " चवली पावली ची आचमने चालतात " असे  म्हणून दुर्लक्ष केले जायचे व  जी सांगीतिक कला तो कलावंत सादर करते आहे  त्यावर  जीव ओवाळून टाकला जायचा।  

प्रत्येक बाबीमध्ये फायदा  किंवा तो टा  याचा विचार  न  करता  निखळ  आनंद  घेणे  व  देणे काय  असते  हे कळण्यासाठी  है चित्रपट  पहाणे  व पुलकित  होऊन त्यांच्या  साहित्याची  पारायणे करणे गरजेचे  आहे। 

अफाट  प्रतिभेचा  माणूस सैरभैर होऊन लय , ताल चुकण्य ाची जी  शक्यता असते  व त्याला  गोड़ शिस्तीची चौकट आ खून त्याच्या  प्रतिभेचे जर "channelisation" केले तर नक्कीच  साहित्याचे  मळे फुलल्याशिवाय राहत नाही  सुनीताबाई  या  खऱ्या अर्थाने ती  चौकट होत्या।  जि ण े  रांगोळीच्या कणांना विस्कटू न  देता, छान  चित्रांची  निर्मिती  होईल  ऐसे पाहिले। 

" इरावती हर्षे " या अभिनेत्रीचे  विशेष कौतुक कारण त्यांनी सुनिताबाईचे पात्र ताकदिने उभे केले आहे 

या चित्रपटाचा उत्तरार्ध ०८ फेब्रुवारी रोजी  येणार  आहे  तो पण तितकाच  सुन्दर  असेल  अशी  आशा करतो  आणि अपेक्षांच्या  स्वप्नरंजनात रंगून जातो कारण  उत्तरार्धा तले पु.ल पाहिलेल्या पिढीचा मी प्रतिनिधि  आहे। 


तात्पर्य :  "उप "जीविकेने (नौकरी,व्यवसाय इत्यादि ) जीविकेची  (मित्र, छं द , साहित्य , कला , क्रीड़ा ), गचांडी धरण्याच्या काळात  जीविकेवर  निस्सीम प्रेम करुन मनुष्यजन्म सार्थकी लावणाऱ्या आनंदयात्री पु.ल ना  शत ःश प्रणाम ! कारण  या माणसाने आम्हाला " हसविले " ! व  महेश  मांजरेकर यांचे  आभार कारण  त्यांनी ते आम्हाला  " दाखविले"!





<a href="http://www.marathibloggers.net/" target="_blank"><img alt=" मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!" src="http://goo.gl/YckhY"></a>


Discover latest Indian Blogs
<a href="https://www.blogadda.com" title="Discover latest Indian Blogs"> <img src="https://www.blogadda.com/images/blogadda.png" width="80" height="15" border="0" alt="Discover latest Indian Blogs" /></a>


  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...