Saturday 29 February 2020

Image result for marathi bhasha logo   मावशीच्या  कचाट्यातील  "माय"मराठी 

भाषाशात्र्यज्ञांच्या मते  संवादचे माध्यम असणाऱ्या भाषांचे ४ भागात वर्गीकरण करता येते।  या भाषांची जर एक उतरंड पद्धतीने मांडणी केली  तर सर्वात तळाशी येते ती " बोली भाषा " ज्यामध्ये जगातील ९८% भाषा समाविष्ट होतात।  या परिघावरच्या भाषा जगातील १०% पेक्षा कमी लोक बोलतात। या भाषा छोट्या छोट्या समुदायात संवादासाठी वापरले जातात।  त्यानंतर नंबर लागतो तो काही प्रमुख " प्रादेशिक/राष्ट्रभाषा  यांचा ".  यामध्ये एखादा प्रदेश, त्यातील लोक यांची बोलण्याची , लिहण्याची , शाळेत शिकण्याची , काही प्रमाणात राज्य कारभाराची  भाषा ही समान असते।  तीच त्यांची सांस्कृतिक ओळख पण ठरते।  अशा भाषात  मराठी , गुजराथी  बंगाली   किंवा  कोरियन ,  जापनीज अशा भाषा येतात त्यांना " मध्यवर्ती भाषा " असे म्हटले जाते। यात १% भाषा अणि ५०% पेक्षा जास्त ती भाषा बोलणारे लोक अशी मांडणी असते।  त्यानंतर येतात त्या "राष्ट्रभाषा ". खण्डप्राय देश किंवा विविध देशात पसरलेले लोक ज्या एका समान धाग्याने जोडले जातात  ती  म्हणजे ही भाषा , ज्यामध्ये मग हिंदी फ्रेंच , जर्मन ,मलय , स्पॅनिश , रशियन  अणि इंग्लिश अशा  भाषांचा समावेश होतो।  या भाषा बहुतेक लोकांसाठी बोली किंवा  मातृभाषेनंतरची दूसरी भाषा असते। साधारण १० कोटिपेक्षा जास्त लोक ती भाषा बोलत असतात।  या उतरंडीवर सर्वात उच्च स्थानी येते ती "इंग्लिश ".  जागतिक संवाद , ज्ञानाची कवाड़े खुली करणारी  भाषा म्हणून ती आत्मसात करण्याकडे आपला कल असतो।  त्याला भाषाशात्र्यज्ञ "सर्वोच्च केन्द्रीकरणाची " भाषा म्हणतात। 

"प्रभो या एका खांबा वरी उभी , महाराष्ट्र द्वारका " असे लोकमान्य टिळकांना उद्देशून शाहिर गोविंद यांनी उद्धार काढले होते त्यात थोड़ा बदल करून " प्रभो या एका खांबावरी उभी , संवादाची द्वारका" असे जर आपण इंग्लिश बाबतीत म्हटले तर काही वावगे ठरणार नाही। 

माणूस म्हणून आपल्याला सर्वात जास्त मोठी भूक कशाची असेल तर ती आपुलकीची।  माणसामाणसात  आपुलकी निर्माण करणारे अनेक धागे असतात , काही कौटुंबिक असतात , कधी ते धर्म किंवा जाती-पोटजाती यावर आधारलेले असतात , पण सर्वात प्रबळ दुवा ठरतो तो म्हणजे "भाषा ". शब्द हा माणसाला लागलेला सर्वात मोठा शोध आहे। रामदास म्हणतात "आधी वंदु कवीश्वर। जे शब्द सृष्टीचे ईश्वर।" म्हणजे साऱ्या जगाला शब्दांनीच ईश्वरता किंवा वैभव बहाल केले आहे। "आहार , निद्रा ,भय अणि मैथुन " ही प्राणिमात्रांची लक्षणे  माणसाला पण लागू होतात  पण माणसाला  अजून एक देणगी लाभलेली आहे ती म्हणजे "शब्दांनी समृद्ध होत जाणारी भाषा " माणसाला जे जे जाणवते ते ते कळविण्याची शक्ती मुख्यत: शब्दशक्ती माणसाला लाभलेली आहे।  उपयुक्त व्यवहारासाठी , शिक्षणासाठी किंवा आनंदासाठी म्हणा  हे शब्द , त्यातून उमटणारे ध्वनि , होणारी भाषा निर्मिति  आपले व्यक्तिमत्त्व घडविते। जीवनाचे असंख्य सन्दर्भ एकेका शब्दाभोवती घर करून बसलेले असतात। कंप्यूटर, मोबाइल  किंवा कॅल्क्युलेटर  हे आता प्रत्येक घरोघरी असतात  असे असताना जर सहज मी इथे लिहताना म्हटले की " बे एके बे , बे दुणे चार ", ते वाचून होण्याच्या आधी निम्मे लोक मनात " बे त्रि क सहा " असे मनात म्हणाले असतील  सुद्धा  कारण हा एक पाढा  तुम्हाला जादुई शक्ति सारखा तुम्ही  जगाच्या पाठीवर कुठेही असा तुमच्या बालपणात घेऊन जातो। प्राथमिक शाळा , शाळा मास्तर , वर्गातील मित्र किंवा मैत्रीणि दिसायला लागतात।  हा साधा पाढ़ा तरल आठवणींची लहर मनात उमटून जातो।  आता दूसरे उदाहरण घ्या  आपल्याला जर कोणी थालीपीठ म्हटले की  काय  ते समजावून सांगण्याची वेळ येत नाही  कारण थालीपीठ या शब्दाच्या उच्चारात  रंग , रस , नाद , गंध , स्पर्श हे पंचम सुर मनात रुंजी घालायला लागतात।  कारण तो फक्त एक चवदार पदार्थ नसतो तर त्याच्या आठवणीने तुम्ही  वडिलोपार्जित घर , त्यातील  स्वयंपाक घर , थालीपीठ थापताना  होणारा आईच्या हातातील बांगड्यांचा आवाज , थालिपीठावर हलकेच ठेवलेला लोणी गोळा , त्या थालिपीठाचा सुटलेला खमंग वास , असे असंख्य आठवणीचे गाठोड़े उलगडत असता।  शेवटी माणूस म्हणजे अश्या असंख्य आठवणींचे गाठोड़ेच।  त्याला आपण मग संस्कृति म्हणतो। असे अनुभव आपल्यासारखे जर दुसऱ्या कुणाला आले तर तो लगेच आपला माणूस होतो। तो गट मग समान भाषिक गट होतो कारण त्या भाषेने समाजाला समान संदर्भ दिलेले असतात। 

ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे  शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानावर पडतात , त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसून ती प्राणाशी जोडलेली असते। शरीरातून रक्त वाहते तसे  आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहते।  तो प्रवाह थांबविणे अशक्य आहे  आईच्या दुधावर शरीराचे पोषण होते तेव्हा तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण होते  कारण केवळ देहाच्या पोषणाने भागत नाही , किंबहुना माणूस म्हणजे ज्याला मन आहे तो अशी जर मांडणी केली तर भाषा ही मनाचे पोषण करते।  ती मातृभाषा असते।  त्या भाषेबद्दल आपल्याला प्रेम वाटणे , मानवी जीवन समृद्ध करणारे लिखाण , ज्ञान , साहित्य , कला यांची निर्मिति जर त्या भाषेत होत असेल तर त्या भाषेबद्दल आपुलकी असणे साहजिकच। 

पुष्कळ संस्कृती  कालप्रवाहमध्ये पाचोळ्यासारख्या वाहून गेलेल्या आपण पाहतो। युद्ध होतात , विजेती राष्ट्रे आपली संस्कृति पराजित राष्ट्रांवर लादत असतात  त्याचा प्रभावी उपाय म्हणजे पराजित राष्ट्राची भाषा नष्ट करून आपली भाषा लादणे। आपली भाषा ही राज्यसत्तेची भाषा करायची अणि ती ज्याला येते तोच ज्ञानी अणि बाकी सर्व अडाणी असा समज लोकांच्या मनावर बिंबवायचा। विजेत्यांच्या भाषेचेच नव्हे तर त्यांचा आचार विचार , चाली रीती  यांचे अनुकरण करणे क्रमप्राप्त होते। चांगले मराठी बोलणारा  माणूस पण अडखळत का होईना पण इंग्लिश बोलण्याला प्राधान्य द्यायला लागतो।  साहेबांचे कपडे प्रिय वाटू लागतात  अणि पराजित मनाने जेत्यांच्या सत्तेला केलेला तो सांस्कृतिक मुजरा ठरतो।  आपल्याकडे साधारण हेच झाले। 

महाराष्ट्रात आज मराठी पेक्षा इंग्लिशला जास्त मान आहे स्वातंत्र्यपूर्वी इंग्रजी राज्यात इंलिश राजभाषा होती  ती शिकण्याची सक्ती होती म्हणुन असेल पण तिला  न्याय मिळत होता।  पण आता स्वतंत्र भारतात किंवा महाराष्ट्रात तशी सक्ती नाही। पण इंग्लिशची किल्ली हातात असेल तर प्रगतीची अनेक दारे खुली होतात हे लोकांनी ओळखले आहे।  श्री पु भागवत एकदा म्हणाले होते की  "खुद्द महाराष्ट्रात ह्या इंग्लिशचे आकर्षण इतके वाढले आहे की पुढील शतकात मराठी कुठलेही साहित्य वैगरे नसलेली बोलीभाषा होऊन बसेल "

त्या मध्ये बऱ्याच अंशी तथ्य आहे कारण भाषा ही आचार विचारात बदल करते , इंग्लिश सोडून दूसरी भाषा येत नसेल तर सगळे व्यक्तिमत्त्व इंग्रजांची नक्कल करण्यात जाते।  ही नक्कल आता आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसते।  लहान मुलांची गाणी असोत किंवा सण-समारंभ असोत , आई बाबांचे उल्लेख "My Folks " असा होतो तर  दसरा दिवाळी पेक्षा "सांता क्लॉस " हा राम /कृष्णाचा अवतार असल्यासारखे "Christmas "चे प्रस्थ वाढते आहे।  "Halloween "ची "थीम पार्टी " साजरी करताना "होळीची " बोंब "Old Fashion " वाटायला लागली आहे। 

प्रत्येक बाबतीत फक्त आर्थिक नफा हे एक ध्येय असेल तर आधुनिक यंत्र अणि  ज्ञानाधारित तंत्राच्या युगात सगळ्याच संस्कृति सपाट होऊन आपापली वैशिष्ट्य गमवून बसल्या आहेत। हा आघात इथेच संपत नाही , भाषिक शब्द समुहावर पुढील चढ़ाई असते। सावरकरांनी १९२० मध्ये "मराठी भाषा शुद्धिकरण " या मथळ्याखाली केसरीमध्ये विपुल लेखन केले  अणि त्यामध्ये बऱ्याच इंग्लिश शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द निर्माण केले मग ते "विदूयतदहिनी "असेल किंवा "क्रमांक , दिनांक , पटकथा , दिग्दर्शक पर्यवेक्षक " इ।  अणि त्यांनी सांगितलेले धोका खरा ठरला तो म्हणजे  " मराठी बोलताना दुसऱ्या भाषेतील शब्द वापरणे म्हणजे घरातील सुन्दर सोन्याची वाटी फेकून देऊन चीनी मातीची भांडी वापरण्यासारखे आहे "

आज सर्रास आपण चीनी मातीची भांडी वापरत आहोत अणि ती कशी मस्त आहेत हे स्व:तला पटवून देत आहोत। 

"अमृतातेंहि पैजा जिंकणाऱ्या " मराठीतून ज्ञानदेवांनी "हे विश्वची माझे घर "अशीच व्यापक मांडणी केली आहे।  त्यामुळे इंग्लिश मावशीने माय मराठीचा गळा घोटला असे उथळ निष्कर्ष  कुणाच्याच फायद्याचे नाहीत।  वर  लेखात मराठीचा उल्लेख करताना  भावना , आठवणी अशा मार्गाने जास्त येतो  त्या अर्थाने ती स्मरणरंजनाची भाषा ठरते।  अणि आजच्या "ज्ञानाधारित  अर्थव्यवस्थेत (Knowledge based  Economy) इंग्लिश ही ज्ञानोपासनेची भाषा म्हणून पुढे निघून जाते।  उदाहरण घ्यायचे झाले तर ज्ञानेश्वरांनी "गीतेचा "सारांश मराठीतून मांडला ती म्हणजे "ज्ञानेश्वरी ". त्याकाळी गीता हा ज्ञानोपासनेचा ग्रंथ होता तो ज्ञानेश्वरांनी सर्वांना समजावला जावा म्हणून मराठीत आणला , तसे आजच्या काळात तंत्रज्ञान , कृत्रिमप्रज्ञा , माहिती तंत्रज्ञान हे मराठीत समजावून सांगण्याची आवश्कयता आहे।  जो पर्यन्त  ती ज्ञान भाषा होत नाही तो पर्यन्त  इंग्लिश च्या कचाट्यातून तिचे सुटणे  अवघडच।  कारण तसे झाले नाही तर भाषेबरोबर संस्कृति अणि आचार विचार पण विस्मृतीत जाण्याचा धोका आहे।  त्या दृष्टीने प्रयत्न चालू झाले आहेत।  अच्युत गोडबोले असोत  भूषण केळकर असोत  कला , क्रीड़ा विज्ञान  या पासून ते अगदी "इंडस्ट्री ४.० " पर्यन्त गोष्टी लोकांना समजाव्यात यासाठी वेगवेगळे उपक्रमराबवित आहेत  , पुस्तके लिहित आहेत।  हे प्रयत्न वाढविणे हीच काळाची गरज आहे। 

तेव्हाच आपण अभिमानाने म्हणू शकू 

"लाभले आम्हांस भाग्य , बोलतो मराठी 
   जाहलो खरेच धन्य      एकतो मराठी /"

नुकत्याच झालेल्या मराठी दिनानिम्मित जे सुचले ते तुमच्यासमोर मराठीतून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न। 
मराठी दिनाच्या शुभेच्छा। 



Saturday 22 February 2020

    Image result for travel   YOLO & मोदीजी 

५ ट्रिलियन डॉलर (५ लाख करोड़ डॉलर) च्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न अणि जेमतेम ५% च्या आसपास असणारा आपला विकासदर ही वास्तविकता  या दोहोमधील  अंतर कापून जायचे असेल तर गरज आहे  कल्पना ,  करते राजकारणी (बोलके नाही )  अणि  लोकसहभाग या त्रिसुत्रीची। त्यासाठी दिशा देण्याचे काम ( की दशा दाखविण्याचे काम ? )करणारा  महत्त्वाचा सोपस्कार फेब्रुवारी मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पार पड़ला तो म्हणजे "वार्षिक अर्थसंकल्प ". 

 " जोडोनीया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे खर्च करे " या तुकोबांच्या म्हणी प्रमाणे  देशरूपी गाड़ा चालविणाऱ्या  सरकारच्या उत्पन्न  आणि खर्चाचा मांडलेला लेखाजोखाच।  लोकांकडून/ कंपन्यांकडून  प्राप्ती कर वसूली  ,वस्तु सेवा कर , अबकारी शुल्क , करोत्तर महसूल (Disinvestment etc.) , भांडवल प्राप्ती (Dividend etc.) आणि   बाजा रातून  उचलिलेले कर्ज अश्या माध्यमातून सरकार आपले उत्पन्न  मिळविते।  यातील करांचे प्रमाण वाढले  अणि कर्जाचे प्रमाण कमी असेल तर वर म्हणल्याप्रमाणे  धन हे उत्तमरीतिने जोड़ले जात आहे  असे समजले जाते।

आता देश चालविण्यासाठी हा  निधि खर्च करताना  केंद्र सरकार तो  पगार , अनुदाने , पेंशन , कल्याणकारी योजना , पायाभूत सुधारणा बांधणी ,देशाचे संरक्षण, राज्य सरकारकडे निधि हस्तांतरण  , कर्जावरील व्याजाची परतफेड  इत्यादि साठी वापरते।    देश उभारण्यासाठी  होणारा खर्च , पायाभूत सुविधांसाठी होणारे निधिवाटप किंवा संरक्षणावर ओतला जाणारा पैसा  हे सर्व चांगल्या विचाराचे प्रतिक आहे. कल्याणकारी योजना , कर्जावरील व्याजाची परतफेड, कर्जमाफीसारख्या लोकानुयायी योजना, करात कपात   व त्यासाठी राज्य सरकारकडे  जास्त निधि हस्तांतरण हा  खरे तर तुकोबांना  अभिप्रेत नसलेला  उदास विचार ठरू  शकेल। 

वास्तविकता अशी आहे करसंकलन कमी होत आहे।  लोकानुयायी योजना, अनुदाने , कोण जास्त फुकट गोष्टी वाटतो आहे याची स्पर्धा यामुळे  देशाचा विकासदर वाढविण्यासाठी शाश्वत ठरतील अशा बाबींवर ( शिक्षण ,आरोग्य , रोजगार ,पायाभूत सुविधांचे जाळे ) खर्च करताना  पैसा अपुरा पडतो आहे। करोत्तर महसूल (Disinvestment etc.), भांडवल प्राप्ती (Dividend ) मधून जास्तीत जास्त पैसे उभे करून  देश चालविता येईल  अशी काहीशी मांडणी दिसते आहे. हे म्हणजे नोकरीत पगार वाढत नाही किंवा असलेला वेळेत मिळत नाही तरी पण संसार चालविण्यासाठी  वडिलोपार्जित मालमत्तेतील काही भाग विकून  गुजारा करण्यासारखे आहे। 

हा उदास विचार जेव्हा वाढीला लागतो तेव्हा आपल्या हातात असणाऱ्या पैश्याचे मूल्य घसरू नये , महागाई आटोक्यात रहावी म्हणून RBI आपले पतधोरण ठरवत असते. उत्तम व्यवहार हा धन जोड़ताना असेल आणि उत्तमच विचार तो खर्च करताना असेल तर पतधोरण ठरविणे थोड़े सोपे असते।  सामान्य लोकांच्या ठेवीवरील व्याज अणि कर्जावरील व्याज यांच्यातील बदल टिपणारे हे धोरण असे साध्या भाषेत त्याला वर्णिता  येईल। तो दूसरा सोपस्कार  म्हणजे RBIची  पतधोरण विषयक आढावा बैठक जी  मागील आठवड्यामधे झा ली व  व्याजदर स्थिर  ठेवण्याचा  निर्णय RBI ने घेतला। 

निर्यातील होत असलेली घट (exports ), देशांतर्गत व्यापारात दिसत असलेली मंदी सदृश्य परिस्थिति(Slowdown ) , उत्पादकता  निर्देशांका तील  घट (Manufacturing Index Decline  ), अनुत्पादक कर्जे (NPA)यांचे वाढलेले प्रमाण यामुळे नविन कर्ज निर्मिति साठी आलेली बंधने , ज्याला आपण "Consumption Trend  " म्हणतो त्यामधे आलेली मरगळ हे भारतीय अर्थव्यवस्थेभोवती दाटलेले काळे ढ़गच ।  हे कमी म्हणुन की काय  " Coronavirus " या  नव्या विषाणुने  घातलेले थैमान।  चीन मधून सुरु झालेल्या या नवीन संकटाने आता जवळ जवळ २/३ जग व्यापले आहे। जागतीकरणाच्या काळात हे साहजिकच पण त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अधिकच गर्त्यात जात चालली आहे। पण म्हणतात ना "Every dark cloud has  a silver lining".  तो आशेचा किरण मला दिसतो "यंगीस्तान" मध्ये। व त्यांची फिलॉसोफी "YOLO ". 

 "यंगीस्तान" नावाची काय भानगड़ आहे असे जर वाटत असेल तर असे लक्षात आले की  सध्या  भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी  ५०% लोक हे  २0 ते ४०   वयोगटातले आहेत।  आकड्याच्या भाषेत बोलायचे तर  सुमारे ६० कोटी लोक  या वयोगटातील असून ते  "तरुणाई / Millennials / Generation Z " अशा विविध  संज्ञांनी  ओळखले जातात। ही संख्या  अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या  दुप्पट( २ times )  आहे ( अमेरिकन लोकसंख्या ३० कोटी ) अणि  ग्रेट  ब्रिटेनच्या  ( आता लिटिल इंग्लंड ?)  एकूण लोकसंख्येच्या   दसपट ( १० times ) आहे (ग्रेट  ब्रिटेन लोकसंख्या  ६  कोटी).  या  तुलनेतून या संकल्पनेची व्यापकता  आपल्या नजरेत भरते।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता  असल्यानंतर  संख्या ( Stats ) & विदा( Data )  शास्त्राच्या नियमानुसार त्याला आपण समूहामध्ये( Cohort ) कैद करू शकतो । तसे करताना या समूहाकड़े  आपण  ग्राहक  म्हणून बघितले पाहिजे अणि   बाजारपेठ   प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) तयार करून  मग या यंगीस्तानला   आचार -विचार , आवडी -निवडी , आशा -आकांक्षा , खान-पान या  सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करता येईल ।  यातून बाजारपेठेत आपले उत्पादन योग्य व्यक्तीपर्यंत पोहचविणे  सोपे जाईल।

"काशीस  जावे नित्य वदावे " हे ब्रीद वाक्य  जोपासणाऱ्या भारतीय मानसिकतेत " तीर्थयात्रा " म्हणजेच फिरणे  असा साधा सरळ हिशोब होता। मनुजाला चातुर्य आणणारे जे काही घटक संस्कृत सुभाषितात सांगितले आहेत त्यामध्ये पण " केल्याने देशाटन " पहिल्या क्रमांकावर येते पण विविध कारणाने ते "तीर्थयात्रा" या संज्ञेपाशीच थांबते।  आपल्या समाज जीवनात "Tourism " साठीचा खर्च हा  गुंतवणुकीचा भाग नसून  खर्चाचा (Discretionary Spending ) चा भाग होता।  त्यासाठी कर्ज काढणे  हे तर "अब्रम्हण्यमच "

"देश बदल रहा है " च्या धर्तीवर हे काही जुने ग्रह , सवयी , दृष्टिकोन हे बदलत आहेत।  वर उल्लेख केलेला जो यंगीस्तान नावाचा "Cohort " आहे , त्या Millennials  मधील २५-३० %  लोकां ना( सुमारे १०-१५  कोटी ) असे वाटते की  "Travel (प्रवास ) हे  व्यावसायिक प्रगति , कौटुंबिक बंध जोपासणे   अणि  समाजातील आपली पत उंचावणे (Status Symbol ) यांचे प्रतिक आहे। 


"Don't listen to what they say, go see" या चीनी म्हणीप्रमाणे  अनुभव घेणे या लोकांना फार महत्वाचे वाटते।  नुकत्याच एका  टूर कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार समाज माध्यमे व त्याचे आकर्षण यातून "Unique Experience " व त्यासाठी मजबूत पैसे खर्च करण्याची तयारी हे या Millennials चे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल। कामानिमित्त असू दया किंवा कौटुंबिक सहल असू दया , वर्षातून ३०-ते ३५ दिवस  यातील बहुतेक लोक प्रवास करत असतात किंवा करू इच्छितात।  "Yolo " म्हणजे "You Only Live Once"  हा नवा परवालीचा शब्द झाला आहे।  त्यामुळेच असेल कदाचित   "Package Tours " अणि त्याबरोबर येणारे आखलेल्या दिवसातील "sightseeing " असा रूढ़ प्रकार सोडून आता खास आपल्यासाठी बनविलेले  प्रवास  अणि त्यातील वेगवेगळे प्रकार आता रूढ़ होत चालले आहेत।

कधी त्यामध्ये   "सिसीली , इटली मधील Mt Etna  येथील hiking असते तर कधी साउथ अफ्रिकेतील "Bloukrans " पुलावरून करायची "Bungee Jumping " असते।  कुठे मलेशियातील  "क्लोरल फ्लायर " येथील दोन बेटांच्या दरम्यानची "Zipline " एन्जॉय करायची असते।  कुणाला फ़िनलैंडमधील इगलू टेंट खुणावत असतो तर कुणाला  khaoYai , Thailand  मधील बबल स्टेची मजा लुटायची असते। कुणाला "डिजिटल डीटॉक्स " चे वेड असते , तर कोण फ़ूड टूरिस्ट असतो।

थोडक्यात काय " रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी " हा जो गोड अभंग आहे।  तिथे भक्ताला विठ्ठल दर्शनाने लोचनांना  सुख मिळालेले असते इथे लोचनांना  सुखावणारी ही  वर वर्णन केलेली असंख्य रुपे। दर्शन या संकल्पनेमध्ये पाहिले किंवा भेटले या नैसर्गिक कृतीबरोबर "आज अचानक गाठ पडे " मधील "अचानकता " ही पण तितकीच मोलाची आहे।  त्यातून येणारा अनुभव हा YOLO संकल्पनेशी घट्ट जुळणारा आहे।

आता याचा अणि भारतीय अर्थव्यवस्थेचा काय संबंध असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येईल।

"Travel आणि Tourism(पर्यटन )" हा एक विभाग(सेक्टर ) म्हणून वर्षाला २४० बिलियन डॉलर म्हणजे साधारणत: भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १०% वाटा निर्माण करत असतो। ४ कोटी २० लाख रोजगार निर्माण करतो जो  उपलब्ध आकड़ेवारीनुसार एकूण रोजगार निर्मितीच्या ८% आहे।  २०१८-१९ च्या माहितीनुसार भारतीय लोकांनी १८२ करोड इतक्या ट्रिप देशांतर्गत पूर्ण केल्या आहेत। सुमारे ५०-६० कोटी लोक  विविध कारणाने प्रवास करत असतील अणि परतीचा प्रवास वजा करून हिशेब लावला तर माणसागणिक १.५  वेळा आपण सर्वांनी  वर्षभरात प्रवास केलेला आढळतो।  देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की भारतीयांनी किमान ५ भारतातील पर्यटन स्थळांना वर्षातून एकदा भेट द्यावी। "खूपच चांगले पण अंमलात आणायला खूप कठीण " उद्दिष्ट असे त्याचे वर्णन बऱ्याच लोकांनी केले।  सध्याच्या सरासरी १.५  वेळा पासून मोदीजींसाठी अणि पर्यायाने  देशासाठी जर आपण मनावर घेतले तर  सरासरी ३ वेळा जरी प्रवास केला तरी देशांतर्गत "Travel आणि Tourism " मधून निर्माण होणारे उत्पन्न दुप्पट होईल। त्याचा सरळ संबंध त्यातून निर्माण होणाऱ्या अर्थकारणाशी आहे अणि रोजगार निर्मितीशी आहे। 


संपन्न भारतीय परंपरा , खण्डप्राय देश असल्यामुळे लाभलेली नैसर्गिक अणि सांस्कृतिक विविधता , खुप सुरेख अणि विविधतेने नटलेली खाद्यसंस्कृति , मेडिकल Tourism साठी लागणारी संसाधनची उपलब्ध्ता , रस्ते अणि हवाई वाहतुकीच्या पुरेश्या सुविधा  , धार्मिक सहलीसाठी  असलेली मुबलक ठिकाणे  हे असे सर्व असताना पटकन मनावर घेऊन करून टाकता येईल (ज्याला आपण Low Hanging Fruit  म्हणतो ) असा खरे तर हा विषय आहे।  Unesco च्या अहवालनुसार हेरिटेज साइट्स मध्ये भारत जगात ६ व्या क्रमांकावर आहे।  सांस्कृतिक वारसा विभागात ९ व्या , तर नैसर्गिक साधनसंपत्ति मध्ये २४ व्या स्थानावर आहे। किफायतशीर प्रवास ठिकाणांमध्ये १० व्या क्रमांकावर आहे।  पण दुर्दैवाने हे सर्व  Potential या सदरात मोडणारे आहे। 


पण या सेक्टर कड़े कधी Priority म्हणून लक्ष दिले गेलेले नाही। त्यामुळे जगातील  प्रवास योग्य १३६ देशात  प्रवास सुरक्षा या सदरात भारत ११४ आहे  किंवा  आरोग्य /टापटिप पणा यात १०४ आहे।  व्यवसायासाठी प्रवास सदरात ८९ वा अणि  प्रवास साठी किफायतशीर (वरील मुद्दे धरुन ) ५४ वा आहे। 

पायाभूत सुविधांचे जाळे, प्रवासांसाठी रहाणे अणि खाणे यासाठी सुविधा अणि  जो  समृद्ध , विविधतेने नटलेला  सांस्कृतिक , नैसर्गिक वारसा आहे त्याचे उत्तम मार्केटिंग जरुरी आहे।  हिमालयातील "Hiking " असेल  किंवा केरळ मधील "floating Cottages " असतील , उत्तराखंड मधील चार धाम यात्रा असेल किंवा "Tent Stay " असेल , गुजरात मधील "Statue of Unity " असेल किंवा अंदमान मधील "Scuba Diving " असेल " चुकोनि उदंड आढळते " असे समर्थांनी म्हटल्याप्रमाणे  या सर्व जागा वर उल्लेखलेल्या YOLO संकल्पनेला समृद्ध करणाऱ्या आहेत म्हणून त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे। ज्याला आपण "Outbound " प्रवास म्हणतो तो म्हणजे भारतीय लोकांनी परदेशी केलेला , त्याचे प्रमाण ५ कोटी एवढे आहे  अणि त्यातील २०% म्हणजे १ कोटी लोकांनी जरी देशांतर्गत एखादा प्रवास केला तरी त्या सहभागातून निर्माण होणारी चळवळ अर्थपूर्ण ठरेल। 

जागतिक अनिश्चितता, " Corona वायरस " ची भीति  अणि घसरणारे अर्थकारण यातून सावरण्यासाठी हातभार लावण्याची ताकद देशांतर्गत पर्यटन क्षेत्रात नक्कीच आहे।  ते प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज आहे ती " नवीन कल्पना , लोकसहभाग  अणि करत्या राजकारणी लोक "या वर उल्लेख केलेल्या त्रिसूत्रिची। 

"सृष्टी मध्ये बहु लोक / परिभ्रमणे कळे कौतुक " असे समर्थ सांगून गेलेच  आहेत। आता गरज आहे ते अंमलात आणण्याची। 

Saturday 1 February 2020

Image result for natak mukhavate                           दामले : तुम्ही म्हणाल तसे !

१२०००+ पेक्षा जास्त  नाट्यप्रयोग , ३४ पेक्षा जास्त नाटके , ३ नाटकांचे १००० + अधिक प्रयोग  अणि  एका दिवसात सलग ५ नाटकांचे प्रयोग करण्याचा "Guinness book of World record"  असा नेत्रदीपक प्रवास  करणारा रंगकर्मी म्हणजे अर्थातच "प्रशांत दामले ". " पुढचे पाउल " या चित्रपटातून  मनोरंजनाच्या दुनियेत प्रवेश केलेल्या या नटाने पुढे कधी मागे वळून पाहिले नाही। रंगदेवता अणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून  गेली ३५ वर्षे  वयाच्या साठीकडे झुकलेल्या या चिरतरुण अभिनेत्याने  आपल्या अभिनयाने उभ्या महाराष्ट्राला हसविले।लोकरंजन हा जर नाट्यकलेचा  आत्मा असेल , तर त्या आत्म्याचा आवाज बनुन गेल्या २ पिढ्या महाराष्ट्रातील जनतेला रोजच्या धावपळीच्या , संघर्षयुक्त आयुष्यात  विसाव्याचे , आनंदाचे  दोन क्षण दिले। "वेळ कसा  गेला कळलेच नाही " अशा कमेंट्स हमखास घेणारा नट म्हणजे "प्रशांत दामले ".  २ -२. ५ तास आपल्या अभिनयाने समोरच्याशी संवाद साधून त्याला खिळवून  ठेवणे,  त्याला बाह्य जगाचा विसर पडायला लावणे (Instagram Update किंवा Whatsapp Chat देखील पाहण्याचे  भान  न राहणे )  ही सध्याच्या काळातील नटाचे मोठेपण मोजण्याची मर्ढेकराच्या भाषेतील  "शात्र्यकाट्याची कसोटी " ठरू शकेल।  असा हा "नाट्यतीर्थावरील तपस्वी " नाट्य निर्माता  या नवीन भूमिकेत आपल्यासमोर  नवी कलाकृती / नाटक घेऊन येत आहे। "तू म्हणशील तसे " असे त्या नव्या नाटकाचे नाव।  ती भूमिका जगासमोर ठेवताना ,३५ वर्षे रंगदेवतेची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर पुढच्या पिढीकडे सुत्रे सुपूर्त करण्याचा मनोदय (Passing the baton to next generation)  ही त्याची मांडणी "इदं न मम " च्या धर्तीवर एखाद्या तपस्वीला लाजवेल अशीच। म्हणूनच त्याची दखल घेणे गरजेचे। 

आपण जगताना आपल्याला प्रत्यक्ष पाहून , कुणाकडून तरी ऐकून किंवा पुस्तक वाचून  जे जे काही अनुभव येत असतात ते   ते अनुभव दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची आपल्याला  ओढ़ असते। दर वेळेला तो अनुभव फार मोठा असतोच असेही नाही।  कधी कधी तर ते अनुभव माणसाने प्रत्यक्ष घेतलेले पण नसतात।  दुसऱ्यांनी घेतलेल्या अनुभवांच्या आधारावर कथा रंगू शकते किंवा काही अनुभव कल्पनेतून समोर ठेवता येतात।  आता हे वेगवेगळे  अनुभव कल्पनेने निर्माण करून लोकांना ते वाचत अणि ऐकत रहावे  अशा रितीने सांगण्याची शक्ती ज्याला लाभलेली असते त्याला आपण "प्रतिभावंत " म्हणतो।  अनुभव कथनासाठी तो प्रतिभावंत जे काही माध्यम वापरतो ते म्हणजे संगीत , साहित्य , नाट्य , शिल्प।  या माध्यमांना आपण "कलाकृती " म्हणतो।  या कलाकृतीमधील " मला काही तरी सांगायचे आहे " ची ओढ़  " माझे पण थोड़े ऐका " चे  नाट्य पांघरूण तो अनुभव आपल्याला ऐकायला अणि पहायला लावते  ते म्हणजे "नाटक ". त्या नावातच  आभासनिर्मिति अणि साहित्य नटवून पेश करणे असल्यामुळे  त्याचा आस्वाद घेणारा प्रेक्षक असतो। प्र +इक्षक म्हणजे नुसता पाहणारा नव्हे तर चोखंदळपणे अनुभूति घेणारा रसिक असतो। असे रसिक प्रेक्षक अणि त्यांचे रंजन करणारे रंगकर्मी  या नाटकवेडया महाराष्ट्राला नवीन नाहीत। 

प्रांताप्रांताच्या  काही खास परंपरा असतात , अभिमानाच्या जागा असतात , महाराष्ट्राचे नाट्यवेड त्यातलेच।  पण लोकरंजन , प्रबोधन अणि सामाजिक , राजकीय घडामोडींवर परखड भाष्य वैगरे करताना या "वेडेपणातील "Method in Madness" पण वाखाणण्याजोगी। ही परंपरा चालू झाली आजपासून १७७ वर्षापूर्वी कृष्णातीरी वसलेल्या "सांगलीत ".  १८४३ मध्ये तत्कालीन संस्थानिकाच्या आज्ञेवरुन "सीता स्वयंवर " हे मराठीतील पहिले नाटक सादर केले  ते विष्णुदास भावे यांनी , सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणरायला नमन करून नाटकाची नान्दी म्हटली गेली ती अशी

" पद राग सुधकल्याण ताल त्रिवट / करनाटकी नाटक करो ईशआज्ञा। वाटे मम मना गजानना //धृ //
सकला रंभी तुझे स्तवन करिता जाती विघ्ने पळून /धाव पाव बा गुणज्ञा /१ /
/कैचे होईल हे निर्विघ्न।  आणिक अज्ञ हस्ते जनरंजन या सुमति या हो आज्ञा /२ /
चिन्तामण राव  पट वर धन देऊन करवी नाटक हे उत्पन्न /विष्णुदासा  देऊनी आज्ञा /३/"

कलानिर्मितीची भावना  अणि त्यामागील प्रेरणा  स्वच्छ असेल तर त्याचे प्रयोजन चटकन हृदयाला भिडते।  त्याच मुळे असेल कदाचित भावे यांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आपण पाहतो।  त्यासाठी ज्या नाट्यवेड्या परंपरेचा आपण वारसा सांगतो त्या किर्लोस्कर , देवल , खाडिलकर , कोल्हटकर , गडकरी , वामन जोशी , सावरकर , वरेरकर ,अत्रे , रांगणेकर, पु ल देशपांडे, तेंडुलकर , कानिटकर,विजया मेहता  ते अगदी आत्ताचे केंकरे ,  मोहन वाघ ,, सुधीर भट, लता नार्वेकर  कुलकर्णी , केदार जाधव या सगळ्यांनी तत्कालीन समाज , नाट्यव्यवसाय , नाट्यकला या वेगवेगळ्या  मुद्द्यावर काय तडजोडी केल्या , कुठे पुर्वासुरीचे अनुकरण केले तर कुठे नवीन विचारला वाट मोकळी करून दिली।  हा विचार आनंदाची सफर करणारा आहे , कोणाचे हेवेदावे किंवा तेजोभंग वैगरे करणारा नाही। 

"जीवनासाठी कला " की " कलेसाठी कला " हे द्वंद्व कायमच राहिलेले आहे पण  लोकरंजन या मूळ उद्दिष्टापासून जर रंगकर्मी दूर जात असेल तर त्याची जागा दाखविण्याचे काम पण रसिक प्रेक्षकाने केले आहे। किर्लोस्करांनी  रंगभूमीला देव , राक्षस यांच्या कचाट्यातून बाहेर काढले , खाडिलकरांनी संगीत रंगभूमीचे वैभव  वाढविले।  संगीत रंगभूमीमध्ये "नाटकापेक्षा गाण्याला जास्त महत्त्व येऊ लागल्यावर , नाटक सोडून गायकी दाखविण्यासाठी घेतलेल्या गाण्यातील ताना , मुरक्या प्रेक्षकांना रुचल्या नाहीत। " हे  म्हणजे " भटजीला चांगल्या मंगलाष्टका येतात म्हणून नवरा नवरीला बोहल्यावरून खाली उतरता का " असे म्हणण्यातील प्रकार झाला। त्यातून मग  
वरेरकर ,अत्रे , रांगणेकर यांची " थोड़े संगीत अणि गद्य , संवाद असलेले नाटक " प्रेक्षकांच्या अभिरूचिला रुचत गेले।  कोल्हटकर " भाऊ -बहिणीची " नाटके करीत होते तर तेंडुलकर " सामाजिक रूढ़ि परंपरा, स्री पुरुष संबं ध  यातील दाम्भिकतेवर प्रकाश टाकत होते।  कानिटकर इ नी  ऐतिहासिक नाटकांचा मोर्चा सांभाळलेला होता। हे सर्व चालत असताना "चार घटका करमणूक " या मध्यमवर्गीय मानसिकतेला  साद घालण्यासाठी "निखळ करमणूक " करणारी , विनोदी नाटके पण प्रसिद्ध होऊ लागली। पु  ल देशपांडे यांनी या प्रकारची मुहूर्तमेढ रोवली।  प्रशांत दामले हा असाच निखळ आनंद देणाऱ्या करमणूक प्रधान नाटकांचा झेंडा  पुढे घेऊन जाणारा नायक।  शाब्दिक कोट्या किंवा  चेहऱ्यावरच्या हावभावातून विनोद निर्मिति , जीवनातील विसंगतीवर केलेले भाष्य अणि विनोद निर्मिति ही त्याची बलस्थाने त्यामुळे अंगविक्षेप किंवा इंसल्ट कॉमेडी असल्या विनोद निर्मितीच्या साधनांचा त्याला कधी उपयोग करायला लागला नाही। 

संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे अणि नाटक हे जर खऱ्या आयुष्यातील अनुभव नटवून सांगण्याचे माध्यम आहे हे मान्य केले की " नाटकासाठी , ते जीवंत ठेवण्यासाठी  " संघर्ष आपोआप येतो।  जशी परंपरा जुनी तसाच  संघर्ष पण जुनाच। कधी  तो चित्रपट , रेडिओ , टीवी या सारख्या करमणुकीच्या दुसऱ्या माध्यमांबरोबरच्या स्पर्धेमुळे निर्माण होतो , तर कधी  सोयी , सुविधा , चांगली नाट्यगृहे ,नाटक कंपनी चालविताना येणाऱ्या आर्थिक अडचणी अशा पायाभूत गरजांसाठी पण असतो। 

आज "चित्रपट , नाटक , शॉर्ट फिल्म्स , जाहिराती , वॉइस ओवर प्रोजेक्ट , वेब सीरीज " असे विविध पर्याय खुणावत असताना "FOMO(Fear of missing Out)" च्या प्रभावाखाली एकाच वेळी खूप सारे काम करण्याकडे कल वाढला आहे।  संधी उपलब्ध असताना त्यांना नाकारणे कठीणच , अशावेळी एखाद्या तपस्वी प्रमाणे एका वेळी एकच नाटक किंवा मालिका  किंवा  चित्रपट असे माध्यम निवडून पूर्ण वाहून घेऊन काम करणारे प्रशांत सारखे कलावंत विरळाच।  त्यामुळे त्याच्या कामात ताज़ेपणा टिकून आहे। 

एकांकिका स्पर्धा , कॉलेज फेस्टिवल्स , नाट्य शिबिरे  हे एका बाजूला अणि सोयी , सुविधा , चांगली नाट्यगृहे ,नाटक कंपनी चालविताना येणाऱ्या आर्थिक अडचणी अशा पायाभूत गरजांसाठी संघर्ष दुसऱ्या बाजूला अशा कचाट्यात  नाट्यव्यवसाय सापडलेला असताना "प्रशांत " सारख्या नटा ने  "T-School" सारखी संस्था काढून नवीन रंगकर्मी निर्मितीसाठी आपला हातभार लावला आहे , त्याबरोबरीनेच स्व:त ३४ वर्षे नाटक केलेले असल्याने त्याची आर्थिक गणिते जवळून पहिलेली असल्याने निर्माता होण्याचे  पुढचे पाउल  नक्कीच अभिमानस्पद। 

क्रिकेटला "Commonwealth Sports ते  International Sports" हा प्रवास करण्यासाठी जशी "T-20" ची गरज आहे. तशीच "नाटक " वाचविण्यासाठी "चित्रपट, शॉर्ट फिल्म्स ,, वेब सीरीज " ही सर्व माध्यमे खुलू देणे गरजेचे आहे। या माध्यमातून उद्याचे रंगकर्मी आपल्याला मिळणार आहेत।  ही अस्तित्वाची लढाई नसून सहजीवनाची अणि'त्यातील आपली जागा शोधण्याची धडपड आहे। 

२०२० हे  अखिल भारतीय नाट्य परिषदेने भरविलेल्या नाट्य संमेलनाचे १०० वर्ष आहे। त्या संमेलनाचे अध्यक्ष "डॉ जब्बार पटेल " हे जेष्ठ रंगकर्मी आहेत।त्यांनी देखील  "शॉर्ट फिल्म्स ,, वेब सीरीज" च्या युगात नाटक धंदा वाचविण्यासाठी काय केले पाहिजे याचा उहापोह होणे गरजेचे आहे असे म्हटले आहे। " पुढे होणाऱ्या अध्यक्षीय भाषणात ते आपली भूमिका मांडतीलच।  पण  प्रशांत दामले यांनी त्या दिशेने उचललेले पाउल निश्चितच अभिमानस्पद। 

साहजिकच अशा अवलिया रंगकर्मीसाठी प्रेक्षक पण त्यांच्याच नवीन "तू म्हणशील तसे" या नाटकातील 
गाण्याप्रमाणे  त्यांच्या नवीन उपक्रमांना साद घालेल हे  निश्चित । 

त्याच जागी ठरल्या वेळी वाटले होते येशील / मागून डोळे झाकून माझे ओळख बरे म्हणशील /
मग मी ना ओळखल्याचे नाटक थोड़े करीन , विचार केल्या सारखे करून पटकन हात धरिण/ 




  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...