Saturday 24 July 2021

                                                                            एका दाढीची गोष्ट

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी  नविन आत्मसात केलेला इंग्रजी शब्द या सदराखाली "Pogonotrophy"  हा शब्द  समाजमाध्यमांमध्ये शेअर केला. त्याचा अर्थ म्हणजे  "दाढी राखण्याची व वाढवण्याची कला"त्यांचा रोख अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  रवींद्रनाथ टागोर सदृश्य वाढलेल्या दाढी कडे होता हा भाग निराळा.

 योगायोगाने याच काळात  प्रतीके(Symbols ) आणि परंपरा(Rituals ) यामध्ये गुंतलेल्या आपल्या समाज मनाला जेव्हा दाढी मध्ये आकर्षकपणा ,मर्दपणा ,रांगडेपणा, स्वतःची वेगळी ओळख दाखवण्याची संधी  असे वेगवेगळे संदर्भ सापडू लागतात तेव्हा  दाढी ही "पुरुषाच्या चेहऱ्यावर वाढणारे केस (Facial Hair )" या नैसर्गिकतेला ओलांडून बरीच पुढे निघून गेलेली असते.

 करोना संकटकाळात  एकंदरच ' WFH'  मुळे म्हणा किंवा 'Zoom Call Culture'  मुळे म्हणा  कार्यालयीन क्षेत्रात एक प्रकारचा इन्फॉर्मल पणा आला आहे. Formal Dressing साठी लागणारी  टापटीप गरजेची नसल्यामुळे समस्त पुरुष वर्ग 'यथाशक्ती' आणि 'बायकोची अनुमती'' या शिदोरीवर दाढी ठेवणे, त्याची निगा राखणे असे प्रयोग करू लागला आहे. कधी खुरटी किंवा कधी लांब वाढवून त्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल करण्याकडे  पुरुषांचा कल दिसून येतो.

 परंपरेच्या बाबतीत बोलायचे झाले तर  दाढी वाढवणे आणि येणाऱ्या चातुर्मासाचा काळ याचा संबंध निश्चितच आहे. पूर्वी खाण्यापिण्यावरील बंधनाप्रमाणेच या चातुर्मासात लोक दाढी करत नसत. या परंपरेचे नव्या समाजमाध्यम युगातील प्रारूप म्हणजे "No Shave November".  सारखी फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरील चॅलेंजेस.यामध्ये पूर्ण नोव्हेंबर महिन्यात दाढी न करता वाढलेल्या दाढीचे फोटो फेसबुक व इंस्टाग्राम वर टाकून या स्पर्धेत स्वतःला झोकून द्यायचे.
 
संदर्भासाठी बोलायचं तर दाढी करणे किंवा वाढवणे या गोष्टी स्थित्यंतर दाखवण्यासाठी वापरले जाते हे लक्षात येईल.  मग तो येऊ घातलेला चातुर्मास असेल किंवा " आता बास एकदाचा संपावा" असे वाटत असताना  लांबलेला करोना असेल.

 इतिहासात डोकवायचं झाले तर शेतकरी व लढाईच्या वेळी  मर्द मावळा अशी दुहेरी भूमिका बजावत असताना अंग मेहनतीचे, कष्टाचे काम करताना अंगातील रग ,व्यक्तिमत्त्वातील रांगडेपणा दाढीमुळे खुलून दिसायचं.
" मर्दगडी"  हे विशेषण सार्थ ठरवण्यासाठी कष्टाने तयार झालेले पिळदार शरीर हे जेवढं महत्त्वाचं तेवढेच दाढी आणि पिळदार मिशा या देखील अविभाज्य घटक होते.

 उपजीविकेची साधने जशीजशी शेती आधारित उद्योगाकडून सेवा क्षेत्र किंवा कार्यालयीन कामकाज याकडे सरकू लागली तेव्हा पाश्चिमात्यांचे अनुकरण म्हणा किंवा " Gillette_The Toxic Masculinity" सारख्या जाहिरातीमुळे असेल  गुळगुळीत दाढी करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला.  तरीपण बोकड दाढी, " दिल चाहता है"  चित्रपटानंतर प्रसिद्ध झालेली आमिर खाननी ठेवलेली "गोटी दाढी" आणि  सेलिब्रिटी, तत्त्वज्ञ, विचारवंत यांनी ट्रेंड मध्ये आणलेली "French beard"  राखण्याकडे पण लोकांचा कल होता.तरी पण या सर्व गोष्टी वैयक्तिक आवडनिवड   इतपतच मर्यादित होत्या.

 या मानसिकतेत अलीकडे बराच बदल झालेला आपल्याला दिसून येतो.
  •  व्यक्तिमत्त्व खुलवण्यापेक्षा दाखवण्याकडे कल वाढलेला असल्याने FOMO ची बाधा झालेली तरुणाई  " Things are in control"  हे ठसवण्यासाठी दाढी वाढविते.
  • चर्चा ,मध्यम मार्ग ,सुसंवाद यापेक्षा वितंडवाद आणि आक्रमक भूमिका घेतली तरच आपले प्रश्न सुटतील अशी काहीशी समजूत झाली असल्यामुळे " आक्रमकता"  दर्शविण्यासाठी पण दाढी वाढवली जाते.
  • सिक्स पॅकवाले हे नवयुगातील मदन " आकर्षकता"  खुलविण्यासाठी  दाढीचाच आधार घेतात.
 अंधानुकरण आपला आवडता छंद असल्यामुळे आणि  कोरीव दाढी, आक्रमक देहबोली आणि सतत भकारांत शब्दांची लाखोली  हीच आपली आक्रमकतेची व्याख्या झाल्यामुळे अकरा आक्रमक प्रतिकृती(Clones ) संघात असतानासुद्धा  आपण एकही आयसीसी  क्रिकेट ट्रॉफी का जिंकू शकत नाही याचा विचार करणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे या आक्रमकतेचा परफॉर्मन्स बरोबर काही संबंध असावा असा प्रथमदर्शनी पुरावा तरी निदर्शनास येत नाही.  
त्यापेक्षा विविध केशरचना करणारा कॅप्टन कूल किंवा " Palmolive का जवाब नही" म्हणणारा  कपिल पाजी  हेच आमचे वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन ठरतात.

 प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांची बरोबरी करत असल्यामुळे   दाढी हा पौरुषत्वाचा आयाम बनला आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे।

 हे पण एक  स्थित्यंतर  असेल असा परिपक्व विचार मनात आला. पण तो मांडत असताना आपले  व्यक्तिमत्त्वही भारदस्त दिसावे म्हणून कोणती दाढी ठेवावी हाच आमच्या समोरचा यक्षप्रश्न आहे. 

2 comments:

  1. दाढी ठेवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ... असे म्हणून गालावर चार खुरटे ठेवणारी पण एक जमात आहे

    ReplyDelete
  2. छान. दाढी हा लेखनाचा मोठा विषय आहे. समस्त mammal प्रण्यानमध्ये पुरुष प्राणी दाढी राखून आहेत. मनुष्य प्राणी हा त्याला अपवाद. जसं जसा समाज विकास आणि समृद्धीकडे वळला तस तसा दाढी राखणे हे अनावश्यक किंवा अपवादात्मक झाले.

    ReplyDelete

  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...