खाण्याविषयी थोडेसे.....
अधिक खाण्यावरून खूप बोलणे ऐकल्यानंतर आता मलाही मनापासून खाण्याविषयी आपण पण काहीतरी बोलावे असे वाटू लागले आहे। आपल्याकडे म्हणतात ना " एक वेळ नकटे व्हावे पण धाकटे नको ", त्याच धर्तीवर " मठ्ठ असले तरी चालेल पण लठ्ठ नको " अशी काहीतरी लोकांची समजूत झालेली आहे। माणूस लठ्ठ असणे याच्याशी त्याच्या "अधिक " खाण्याचा संबंध आहे असा एक सार्वजनिक गैरसमज आहे। भरपूर , चापून खाणारी कृश राहिलेली " पाप्याची पितरे " मी आजूबाजूला खूप पाहली आहेत। पापी माणसे बारीक़ असतात यावर भरपूर वर्ष हिंदी चित्रपट पहिल्यामुळे माझा तरी विश्वास बसत नाही। खलनायक लोक पडद्यावर चांगल्या तंगड्या हाणताना पाहून त्यांची पितरे कृश असतील यावर मी झोपेत पण विश्वास ठेवू शकत नाही। अविश्वास दाखवून स्वस्थ बसणे माझ्या चळवळया स्वभावात बसत नसल्याने या विरुद्ध लठ्ठ लोकांची एक ऑनलाइन चळवळ उभी करावी किंवा फेसबुक पेज पोस्ट करावे असा विचार येताच , प्रवेश देताना तो फक्त अणि फक्त जाड़ीवरच अवलंबून असल्यामुळे हे माझे अखिल भारतीय स्वप्न सत्यात उतरलेले नाही।
( टीप :पुण्यात प्रत्येक चळवळ ही अखिल भारतीय & प्रत्येक गोष्ट ही जगात भारी असते )
( टीप :पुण्यात प्रत्येक चळवळ ही अखिल भारतीय & प्रत्येक गोष्ट ही जगात भारी असते )
खाल्लेले अंगाला लावून घ्यायला पण भाग्य लागते। भरपूर चापून खाऊन देखील कृश राहिलेले अभागी थोड़े (?)खाऊन पण मोकळेपणाने अंगावर खेळविणाऱ्या माझ्यासारख्याला लठ्ठ म्हणतात त्यावेळी भूतदयेखेरिज कुठल्याही नजरेने मी त्यांना पाहू शकत नाही।
हा माझ्यामते लहानपणापासूनच्या अन्नसंस्काराचा भाग असावा । खाणे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे कारण त्याबरोबर जीवनातील अत्यंत सुंदर आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत। बन मस्का , वडा पाव , दाबेली , भेळ , पटिस असले अरबट-चरबट पदार्थच आवडण्याच्या काळात " सोकावली आहेत कार्टी,नुसते बाहेरचे खायला पाहिजे, ख़बरदार सारखे बाहेर खाल तर " असा दम भरला जायचा। त्यावेळेला आमची आजी तिचे वय विसरुन आम्हा मुलांच्या चावटपणात सामिल व्हायची। आमचा आणि आजीचा करार असायचा मग आजी हळूच दर रविवारी बाबा कामाला गेले की आम्हाला वर्दी द्यायची व दुसऱ्या क्षणी " खमंग गरमागरम पटिस अणि बनपाव घेऊन यायला आम्ही मार्केटमध्ये धूम ठोकलेली असायची। परत आल्यावर गरमागरम चहा , मऊ लुसलुशित बनपाव आणि खमंग पटिस" असा जंगी बेत असायचा। चहा आणि बनपाव ही जोडीच अशी आहे की खुप वर्षे नुसता पाव पण आपण खाऊ शकतो यावर माझा विश्वासच बसायचा नाही। माझी आजी मूळची नागपूरची असल्यामुळे क्षुधातृप्तीनंतर "वा मज़ा आला " ही तिची प्रतिक्रिया म्हणजे आनंदाची परमावधी असायची। पुढे थोड़े मोठ्ठे झाल्यावर या आमच्या खवय्येगिरिच्या ( किंवा खादाडीच्या ) प्रवासातील आमचे सहप्रवासी होते माझे बाबा आणि नंतर मामा। कुठलेही नविन हॉटेल निघाले की आमची स्वारी पहिल्या एक-दोन आठवड्यामध्ये तिथे पोचलेली असायची। त्याकाळात जर " Hotel rating Apps" असते तर पॉकेटमनीला पुरेल इतके पैसे तर या व्यापातून नक्कीच जमा झाले असते। पुढे शिक्षणासाठी / नोकरीसाठी मुंबईला किंवा पुण्याला असताना 'खिड़की वडा/ जोशी वडा', 'अप्पाची खिचड़ी', 'काटाकिर मिसळ', 'संतोष बेकरीचे पटिस', 'कयानी बेकरीचा मावा केक' , शनिवारवाडयाच्या बाहेरच्या गाडीवरील डोसा , लोणावळ्याचा " कामत बटाटा वडा " किंवा 'कूपर फ़ज ', मद्रास कैफेचा ' मसाला डोसा , पाइनएप्पल शिरा ',ताड़देवची सरदार पावभाजी,पार्लेश्वर वडा पाव ही म्हणजे आमच्या साठी खाद्य-तीर्थक्षेत्रेच ! त्यात उत्साही असा माझा मामा म्हणजे आम्हा खवय्यांचा म्होरक्या। एकदातर नवीन झालेला एक्सप्रेसवे दाखविणाच्या निमित्ताने त्याने आम्हाला जुन्या गोवा हाईवे जवळच्या "दत्त स्नैक्स " या टपरीतील "साबूदाणा खिचड़ी अणि खरवस " खाऊ घातले। जीभेवर विरघळणाऱ्या त्या खरवसाची चव अजूनही ताजी आहे। आज त्याच दत्तचे खालापुर टोलप्लाज़ा जवळ मोठे होटेल आहे।
सांगायचा मुद्दा असा की ही आवड , कळकळ , उदरभरणातला आनंद डॉ दीक्षित किंवा ऋतुजा दिवेकर ( साइज जीरो फेम करीना कपूरची आहार सल्लागार) यांच्या डाइट प्लान च्या मागे झपाटलेल्या फिटनेस प्रेमी लोकांना कोण समजावणार ! सध्या सेल्फी , इंस्टाग्राम फोटो च्या जमान्यात " फिगर " ला आलेले अवास्तव महत्त्व दूसरे काय।
आता डॉक्टर लोकांचे विचाराल तर त्यांचे पोट दुसऱ्यांनी खाल्लेल्या गोळ्यांनी भरत असल्याने आपण किती पोळ्या खाव्यात किंवा खाऊ नयेत यावर सल्ला द्यायला ही मंडळी मोकळी असतात। कारण पोळी ऐवजी गोळी खपविण्यात त्यांचा फायदा आहे। असो।
माझे सोडा , पण भारतीय परंपरा , संस्कृति , सणवार हे जर आपण तपासून पाहिले तर ती एक मोठी अन्न चळवळच आहे। उत्सवात असणाऱ्या जेवणावळी , पंगती असोत किंवा आपले सण-समारंभ असोत , खाद्य हे त्या प्रक्रियेचा महत्वाचा घटक आहे। तिळाची वडी किंवा तीळगूळ असल्यामुळेच संक्रांत न ओढवता ती साजरी करता येते। होळीच्या सणातून पूरणपोळी बाजूला काढ़ा , बोम्ब मारायला ऊर्जा कुठून येणार। गुढीपाडवा साजरा करताना श्रीखंड गरजेचे असतेच ना। रामनवमीतुन सुंठवडा किंवा कृष्णजन्माष्टमीतुन दहिपोहे / दहिलाह्या , हनुमान जयंतितून " खड़ी साखर खोबरे " वगळा , माझा अंदाज आहे बहुतेक लोक स्वःतला नास्तिक घोषित करतील। एवढेच कशाला गणपतीला उकडीचे मोदक किंवा सत्यनारायणला शिरा नसेल तर ते देवालाही चुकल्यासारखे वाटेलच ना। कलियुगातला सत्यनारायण शिरा नाही म्हणून कोपायचा वैगरे ! दिवाळीतून फराळ काढला किंवा कोजागिरी पौर्णिमेतून मसाला दूध वगळा , आता सणात काही राम राहिला नाही अश्या प्रतिक्रियांचा पाऊस पडेल।
माझ्या मते समृद्ध राष्ट्र या संकल्पनेमध्ये खवय्यांना पण स्थान असणे गरजेचे आहे। खाउन तृप्त झालेली माणसे किमान वायफळ बडबडीमध्ये वेळ वाया घालवत नाहीत। "Productivity Index" मध्ये या गोष्टीचा समावेश करण्यासाठी तज्ञांनी जरूर विचार करावा। " उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म। " म्हटले आहे ते काय उगीच नव्हे। जठराग्निला भरपूर आहुत्या पडल्या पाहिजेत। हे "चित्त विशाल होण्यासाठीचे " पुण्यकर्म आहे।
आजकाल " intolerance debate" खूप जोरात आहेत , उदरभरणाकडे केलेले दुर्लक्ष तर त्याच्या मागे नाही ना हे तपासले पाहिजे।
शेवटी काय "या जन्मावर या जगण्यावर ,शतदा प्रेम करावे ", यातले जगणे हे खाण्याशी निगडित असल्यामुळे , खात रहा , खिलवत रहा।
सर्व खवय्यांना जागतिक "वडा पाव " दिनाच्या शुभेछा !
Wa Mandar,
ReplyDeleteEkdum churchurit mast. tula hi Wada Paav divasachya aanek shubhechcha mast tikhat chatnicha vada paav khyala milo.
खूप छान लिहिले आहेस
ReplyDeleteवडा पाव कधी पण घायला मिळाला तरी चालतो
एवढा आवडीचा पदार्थ
तुला आजच्या वडापाव च्या दिवसाच्या शुभेच्छा