Sunday 6 November 2022

 

प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे 




शिक्षण : 
B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक अभ्यास 

अनुभव :

व्यवस्थापन व जनसंपर्क क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत 
सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट मध्ये  अध्यापन 
शिवाजीमहाराज  आणि आधुनिक व्यवस्थापन , गुंतवणूक , करियर मार्गदर्शन  अशा विविध विषयांवर व्याख्याने 
भारत भवन , भोपाळ संस्थेचे विश्वस्त 
वारसा भ्रमण (हेरिटेज वॉक ), पुणे मध्ये सहभाग. 

प्रकाशित साहित्य 



श्री  शिवराय  MBA  FINANCE ? : महाराजांचे यशस्वी अर्थकारण 

श्री  शिवराय  IAS ? : कुशल प्रकाशनाचा वस्तुपाठ 

श्री  शिवराय  VP  HRD  ? :मानव संसाधनांचा विकास 

अरुण शौरी लिखित "  INDIA CONTROVARSIES " या पुस्तकाचा मराठी अनुवाद 

पुरस्कार 

"महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभे" चा  कै.  राधाबाई हरिभाऊ देशपांडे पुरस्कार -श्री  शिवराय  MBA  FINANCE ? : महाराजांचे यशस्वी अर्थकारण 

Saturday 25 September 2021


 

इतिहास अभी जिंदा है ?

मागील महिन्यात Disney Hot star या OTT प्लॅटफॉर्मवर "मुघल एम्पायर" या वेब सिरीज चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यासंदर्भात प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांची प्रतिक्रिया चांगलीच गाजली. वर्षानुवर्षे मुगल राजवटीचे "जुलमी राजवट" असे वर्णन केले गेल्याने कबीर खान यांना अतीव दुःख झाले. वर्षानुवर्षे "आक्रमक; इस्लामचा जबरदस्तीने प्रचार आणि प्रसार करणारे व क्रूरकर्मा" अशी  कल्पोकल्पित(?)  प्रतिमा समाजामध्ये मुघल साम्राज्याची तयार झालीआहे तिला छेद देण्याचे काम यासारख्या मालिका करतील असे त्यांना वाटते. 

मुघल शासक "लुटारू" नव्हे तर "राष्ट्र निर्मितीचे आद्य पुरस्कर्ते" कसे होते या गोष्टी अशा मालिका समोर आणतील आणि चालू असलेल्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देतील असे अकलेचे तारे या कबीर वाणीतून उद्गारले गेले.  मालिकेशी संबंधित निखिल अडवाणी; मिताक्षाकुमार यांनी सुद्धा अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या.  रुदरफोर्ड यांच्या "एम्पायर ऑफ मुगल" या पुस्तकाचा संदर्भ देत आपल्या मूर्खपणाला तत्त्वाचा मुलामा वगैरे द्यायचा प्रयत्नही केला.

 दुसरीकडे  उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले  आहे. आमच्या सरकारच्या काळात 'सरकारी योजनांचा लाभ' हा सर्वापर्यंत देण्यात येत आहे हे अधोरेखित करताना पूर्वी फक्त "अब्बाजानचे चोचले" पुरवले जायचे हे सांगायला योगी आदित्यनाथ विसरले नाहीत .साहजिकच यावर मोठे काहूर उठले. पुरोगामी मंडळी तर यावर तुटून पडली. पुरोगाम्यांचे महामहोपाध्याय करण थापर साहेब यांनी तर थेट तालिबान्यांच्या प्रवक्त्याच्या  वक्तव्याचा दाखला दिला आणि म्हणाले "भारतातील मुस्लिमांच्या न्याय हक्काचे संरक्षण झाले पाहिजे व त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे".  हे तालिबानी पुढार्‍याने आम्हाला सांगावे आणि तेव्हा त्याला दोन शब्द सुनावण्याऐवजी थापर साहेब उजव्या विचारसरणीच्या पक्षांना सल्ले देतात. खरोखरच अद्भुत!

अशा या पुरोगामी म्हणणाऱ्या मंडळींशी  संघर्ष जरा कठीण असतो कारण एक तर ही अत्यंत बुद्धिमान असतात .त्यांच्या भाषणाच्या जोरावर 'पाहिजे असलेला संदर्भ ;विचार उचलून( अत्यंत शिताफीने नकोस असलेला भाग वगळून) एक narrative हे लोक तयार करतात. अर्धसत्य आणि रेटून बोलणे या जोरावर हाच narrative हे अंतिम सत्य आहे हे ठसवण्याचा जोरदार प्रयत्न करतात

याची काही उदाहरणे खाली देत आहे

1. मुघल शासकांनी हिंदूंची देवळे काही जाणून बुजून पाडली नाही तर युद्धाच्या धामधूमीत; तोफ गोळ्यांच्या वर्षावात कधीकधी ती पडली. मंदिराची लूट म्हणाल तर ती राजकीय हेतूने किंवा कब्जा केलेल्या भूभागाची आर्थिक घडी वैगरे बसवण्यासाठी केली गेली( यालाच कबीर खान "Nation Building" वगैरे म्हणत असावा).
2. बाबरनाम्यामध्ये अयोध्येत राम मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली याचा उल्लेखच नाही त्यामुळे अशा कल्पोकल्पित गोष्टींनी पूर्ण मुस्लिम समाजास वेठीस धरण्यात काही अर्थ आहे.
3.  तैमुर लंगने भारतावर स्वारी केली ;लोकांची कत्तल केली ती साम्राज्यविस्तार किंवा लुटीच्या हेतूनेच होती. इस्लामी राजवट स्थापन करण्याचा वगैरे त्याचा काही हेतू नव्हता.
4. शिवराज्याभिषेक दिनाला "हिंदू साम्राज्य दिन " म्हणायचं नाही कारण  म्हणे शिवरायांनी  जे धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन केले त्याचा अवमान करण्यासारखे आहे कारण या मंडळींच्या मते शिवरायांचे स्वराज्य त्यांच्या सैन्यातील 70 टक्के मुस्लिम यांच्या पाठिंब्यावर पण अवलंबून होते. 
5.  "शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला" हा लहानपणापासून पाठ्यपुस्तकात शिकलेला इतिहास आता मात्र पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी या पुरोगामी मंडळींना हरकत आहे कारण "कोथळा बाहेर काढणे वगैरे हिंसक भाषा काही लोकांच्या भावना दुखावते ". अशी भाषा अफजलखानासारख्या सूफी संताबद्दल काढणे आपल्या धर्मनिरपेक्ष भारतात कसे खपवून घेतले जाईल.
6. औरंगजेबासारखा मुघल शासक अत्यंत श्रद्धाळू मुसलमान होता; टोप्या शिवून त्या विकून आलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह चालवायचा . तो क्रूरकर्मा थोडीच असेल.
7. कलम 370 रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात जी बंधने लागली आहेत त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील (मुस्लिम बहुल भाग) लोकांच्या मानवी अधिकारांवर गदा येते आहे.
8. 'गजवा ए हिन्द' मध्ये भारतातील मुसलमानांची संख्या वाढवून भारतात इस्लामी राज्य स्थापन होईल हा  उजव्या विचारसरणीच्या लोकांनी निर्माण केलेला भयगंड आहे.
9. केरळातील मलबार भागात (ज्या भागातील  वायनाड मधून राहुल गांधी निवडून येतात) 1920 -21 आली जे मोपल्यांचे बंड झाले(ज्याला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाली) त्यामध्ये बऱ्याच हिंदूंची कत्तल करण्यात आली त्याला या लोकांनी "वर्ग वादाचा लढा "असे नाव दिले. हिंदूंची कत्तल हे "Collateral Damage"  होते . 

या सगळ्यात घाला कशावर घातला जात असेल तर तो "इतिहासावर". 

इतिहास म्हणजे "जसे आहे किंवा होते तसे " म्हणजे आजच्या भाषेत "फॅक्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ इव्हेंट". आजकाल त्यामध्ये थोडा बदल करून असे म्हणावे लागेल की "इतिहास म्हणजे मी सांगेन तो" किंवा "मला कळेल तो" किंवा "मला पूरक असेल तो" अशी काहीशी गंमत झाली आहे. 'भावना' आणि 'अस्मिता' या दोन भगिनींनी  उच्छाद मांडला आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर या दोघी  भगिनी दुखावतात आणि उगाचच वितंडवाद निर्माण होतो.

अर्थातच खरा इतिहास मांडण्यासाठी "reason over rhetoric" हा approach वापरणे संयुक्तिक ठरणार आहे. कारण फक्त rhetoric मूळे  उजव्या विचारसरणीच्या लोकांना हे लोक "fringe element" ठरवून मोकळे होतात आणि आपण त्यांच्या हातात कोलीत दिल्यासारखे होते.

या पुरोगाम्यांच्या बुद्धिभेदाला उत्तर द्यायचे असेल तर खालील मांडणी करणे गरजेचे आहे

1.  "हिंदू मंदिरे ही राजकीय आणि युद्ध धामधुमीत पाडली गेली आणि त्याची लूट राजनैतिक स्वरूपाची होती" हे सांगताना 'त्यातील मूर्ती का फोडल्या गेल्या' किंवा' मशिदीसमोर दगड म्हणून का टाकल्या गेला 'हा भाग सविस्तर वगळला जातो.'हिंदू पुरुषांची कत्तल' किंवा 'मुंडक्यांचे मनोरे रचणे' हा भाग रक्तरंजित असल्याने हळुवार पुरोगामी मनाला त्याचा त्रास होत असावा.  

काफीर किंवा हिंदू स्त्रिया या बकऱ्यांपेक्षा अधिक लायकीच्या नाहीत त्यामुळे 'त्यांना विकून  टाकणे';  'त्यांच्यावर अत्याचार करणे' किंवा 'त्यांना भर दरबारात नाचायला ठेवणे' व नंतर 'जनानखान्यात भरती करणे' यामध्ये स्त्रीवादी पुरोगाम्यांना देखील  मानवाधिकार वगैरे भानगडी दिसत नाहीत कारण "अमन की आशा" च्या 'म्युझिक ओपेरा' मध्ये हा ऐतिहासिक आक्रोश थोडाच त्याच्या कानावर पडणार आहे.  मिताक्षाकुमार यांना देखील हे माहित आहे कारण सध्या समाजात झालेल्या स्त्रियांवरील अत्याचारकडे आपले लक्ष वेधून ही नेहमीच कसे चालू आहे असे "normalization"करण्याचा प्रयत्न  त्या करतात.
2.  काश्मिरी लोकांच्या मानवाधिकार बद्दल गळा  काढणारे लोक 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांना रातोरात जेव्हा खोऱ्यातून हाकलले गेले; " तुमच्या मुली,बायका घरी ठेऊन तुम्ही निघून जा" अशी पोस्टर लावली गेली आणि "पंडितोंके बिना पंडितायोंके साथ चलो बनाये पाकिस्तान" चा नारा दिला गेला तेंव्हा "भाईचारा" नामक मिठाई खाण्यात पुरोगामी गर्क होते.
3. अफजल खान हा छत्रपती शिवरायांचा जर राजकीय वैरी होता तर त्याने तुळजापूर आणि पंढरपूरची देवळे का फोडली? सूफी परंपरेतला हा कनवाळू संत इतका क्रूर का वागला?  कारण तसे असते तर  अदिलशाहशी लढताना युद्ध धामधुमीत मशीद पाडल्याचे काही संदर्भ पण मिळाले असते . असे प्रश्न विचारले की अस्मिता आणि भावना दोन्ही दुखवितात.
4. शिवाजी महाराजांच्या दरबारात administrative कामासाठी असलेले सात-आठ मुसलमान जर यांना 70% वाटत असतील तर बोलणेच खुंटले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याचा उल्लेखही स्वतःच्या फायद्यासाठी धर्मनिरपेक्ष पद्धतीने  (मुस्लीम तुष्टीकरण) करायला ही मंडळी धजावतात.
5.  बाबरनामा किंवा आलमगिरी मध्ये किती सनम खाने (सनम म्हणजे मूर्ती आणि खाने म्हणजे गृह) किंवा बुत खाने (बुत म्हणजे मूर्ती आणि खाने म्हणजे गृह) उध्वस्त केले व मशिदी उभारल्या याच्या नोंदी आहे त्याकडे डोळस नजरेने दुर्लक्ष करायचे  आणि बाबर नाम्याची "अ योध्येत मशीद उभारली गेली त्या काळातील पानेच गायब आहेत' हा भाग मुद्दामून दडपून ठेवायचा.

 त्यामुळे कबीर खान; भावा खरच बोललास.  "इतिहासाचे अवलोकन" हे पुरावे व ऐतिहासिक संदर्भाला धरूनच झाले पाहिजे. आपल्याला नको असलेले संदर्भ वगळून नव्हे.

रात्र वैऱ्याची आहे पण इतिहास अभी जिंदा है!

Saturday 24 July 2021

                                                                            एका दाढीची गोष्ट

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी  नविन आत्मसात केलेला इंग्रजी शब्द या सदराखाली "Pogonotrophy"  हा शब्द  समाजमाध्यमांमध्ये शेअर केला. त्याचा अर्थ म्हणजे  "दाढी राखण्याची व वाढवण्याची कला"त्यांचा रोख अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  रवींद्रनाथ टागोर सदृश्य वाढलेल्या दाढी कडे होता हा भाग निराळा.

 योगायोगाने याच काळात  प्रतीके(Symbols ) आणि परंपरा(Rituals ) यामध्ये गुंतलेल्या आपल्या समाज मनाला जेव्हा दाढी मध्ये आकर्षकपणा ,मर्दपणा ,रांगडेपणा, स्वतःची वेगळी ओळख दाखवण्याची संधी  असे वेगवेगळे संदर्भ सापडू लागतात तेव्हा  दाढी ही "पुरुषाच्या चेहऱ्यावर वाढणारे केस (Facial Hair )" या नैसर्गिकतेला ओलांडून बरीच पुढे निघून गेलेली असते.

 करोना संकटकाळात  एकंदरच ' WFH'  मुळे म्हणा किंवा 'Zoom Call Culture'  मुळे म्हणा  कार्यालयीन क्षेत्रात एक प्रकारचा इन्फॉर्मल पणा आला आहे. Formal Dressing साठी लागणारी  टापटीप गरजेची नसल्यामुळे समस्त पुरुष वर्ग 'यथाशक्ती' आणि 'बायकोची अनुमती'' या शिदोरीवर दाढी ठेवणे, त्याची निगा राखणे असे प्रयोग करू लागला आहे. कधी खुरटी किंवा कधी लांब वाढवून त्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल करण्याकडे  पुरुषांचा कल दिसून येतो.

 परंपरेच्या बाबतीत बोलायचे झाले तर  दाढी वाढवणे आणि येणाऱ्या चातुर्मासाचा काळ याचा संबंध निश्चितच आहे. पूर्वी खाण्यापिण्यावरील बंधनाप्रमाणेच या चातुर्मासात लोक दाढी करत नसत. या परंपरेचे नव्या समाजमाध्यम युगातील प्रारूप म्हणजे "No Shave November".  सारखी फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरील चॅलेंजेस.यामध्ये पूर्ण नोव्हेंबर महिन्यात दाढी न करता वाढलेल्या दाढीचे फोटो फेसबुक व इंस्टाग्राम वर टाकून या स्पर्धेत स्वतःला झोकून द्यायचे.
 
संदर्भासाठी बोलायचं तर दाढी करणे किंवा वाढवणे या गोष्टी स्थित्यंतर दाखवण्यासाठी वापरले जाते हे लक्षात येईल.  मग तो येऊ घातलेला चातुर्मास असेल किंवा " आता बास एकदाचा संपावा" असे वाटत असताना  लांबलेला करोना असेल.

 इतिहासात डोकवायचं झाले तर शेतकरी व लढाईच्या वेळी  मर्द मावळा अशी दुहेरी भूमिका बजावत असताना अंग मेहनतीचे, कष्टाचे काम करताना अंगातील रग ,व्यक्तिमत्त्वातील रांगडेपणा दाढीमुळे खुलून दिसायचं.
" मर्दगडी"  हे विशेषण सार्थ ठरवण्यासाठी कष्टाने तयार झालेले पिळदार शरीर हे जेवढं महत्त्वाचं तेवढेच दाढी आणि पिळदार मिशा या देखील अविभाज्य घटक होते.

 उपजीविकेची साधने जशीजशी शेती आधारित उद्योगाकडून सेवा क्षेत्र किंवा कार्यालयीन कामकाज याकडे सरकू लागली तेव्हा पाश्चिमात्यांचे अनुकरण म्हणा किंवा " Gillette_The Toxic Masculinity" सारख्या जाहिरातीमुळे असेल  गुळगुळीत दाढी करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला.  तरीपण बोकड दाढी, " दिल चाहता है"  चित्रपटानंतर प्रसिद्ध झालेली आमिर खाननी ठेवलेली "गोटी दाढी" आणि  सेलिब्रिटी, तत्त्वज्ञ, विचारवंत यांनी ट्रेंड मध्ये आणलेली "French beard"  राखण्याकडे पण लोकांचा कल होता.तरी पण या सर्व गोष्टी वैयक्तिक आवडनिवड   इतपतच मर्यादित होत्या.

 या मानसिकतेत अलीकडे बराच बदल झालेला आपल्याला दिसून येतो.
  •  व्यक्तिमत्त्व खुलवण्यापेक्षा दाखवण्याकडे कल वाढलेला असल्याने FOMO ची बाधा झालेली तरुणाई  " Things are in control"  हे ठसवण्यासाठी दाढी वाढविते.
  • चर्चा ,मध्यम मार्ग ,सुसंवाद यापेक्षा वितंडवाद आणि आक्रमक भूमिका घेतली तरच आपले प्रश्न सुटतील अशी काहीशी समजूत झाली असल्यामुळे " आक्रमकता"  दर्शविण्यासाठी पण दाढी वाढवली जाते.
  • सिक्स पॅकवाले हे नवयुगातील मदन " आकर्षकता"  खुलविण्यासाठी  दाढीचाच आधार घेतात.
 अंधानुकरण आपला आवडता छंद असल्यामुळे आणि  कोरीव दाढी, आक्रमक देहबोली आणि सतत भकारांत शब्दांची लाखोली  हीच आपली आक्रमकतेची व्याख्या झाल्यामुळे अकरा आक्रमक प्रतिकृती(Clones ) संघात असतानासुद्धा  आपण एकही आयसीसी  क्रिकेट ट्रॉफी का जिंकू शकत नाही याचा विचार करणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे या आक्रमकतेचा परफॉर्मन्स बरोबर काही संबंध असावा असा प्रथमदर्शनी पुरावा तरी निदर्शनास येत नाही.  
त्यापेक्षा विविध केशरचना करणारा कॅप्टन कूल किंवा " Palmolive का जवाब नही" म्हणणारा  कपिल पाजी  हेच आमचे वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन ठरतात.

 प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांची बरोबरी करत असल्यामुळे   दाढी हा पौरुषत्वाचा आयाम बनला आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे।

 हे पण एक  स्थित्यंतर  असेल असा परिपक्व विचार मनात आला. पण तो मांडत असताना आपले  व्यक्तिमत्त्वही भारदस्त दिसावे म्हणून कोणती दाढी ठेवावी हाच आमच्या समोरचा यक्षप्रश्न आहे. 

Saturday 29 May 2021

                                                                     

जुने ते सोने  -----------   कि बिटकॉइन ?

गेल्या काही दिवसात आर्थिक क्षेत्रातील बातम्या वाचत असताना खालील काही घडामोडी लक्ष वेधून गेल्या त्या अशा :

१. भारतीय शेअर बाजारात निर्देशकांनी  सर्वोच्च पातळी गाठली. शेअर बाजाराचे एकूण मूल्यांकन 3 trillion डॉलरच्या पातळीवर गेले आणि  त्याचे   भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाशी(GDP) असलेले गुणोत्तर शंभराच्या पुढे निघून गेले। ( सामान्यत: हे गुणोत्तर ७० ते ८० च्या दरम्यान असते )
 २.आरबीआयने मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 99 हजार करोड रुपयाचा डिव्हिडंड घोषित केला.
३. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडे तिथल्या 50 हून अधिक वित्तसंस्थांनी 485 बिलियन डॉलर्स एवढी  प्रचंड रक्कम शून्य टक्के व्याजदराने ठेवी  स्वरूपात ठेवली कारण  एवढ्या प्रचंड पैशाचे काय करायचे याची निश्चित रणनीती त्यांच्याकडे नाही.
४. बहुतांश युरोपियन देशात  याआधीच व्याजदर हे शून्याच्या खाली आहेत म्हणजे तिथे बँकेत आपल्याला पैसे ठेवायचे असतील तर आपल्याला बँकेला व्याज द्यावे लागते.
५. जपान मधील मध्यवर्ती बँकेने याआधीच अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अमर्यादित प्रमाणात पैसा छापण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि त्यातील काही पैशाची ETF माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक देखील चालू केलेली आहे.

 सर्व घटनांचा एकत्रित विचार केला तर आपल्याला लक्षात येते की कोरोना महामारीतून जागतिक अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी देशोदेशीच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर कमी करून, अमर्यादित पैसे छापून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची जी खटपट चालवली आहे  त्याचा परिपाक म्हणजे जागतिक शेअर बाजारातील तेजी.
 तेजी म्हणजे तरलतेच्या सुनामीचा आविष्कारच ( Liquidity Tsunami)  म्हणा हवे तर.

आता तुम्ही विचार कराल  याचा तुमच्या माझ्या जगण्याची संबंध आहे का?  निश्चितच. 

उत्पन्नातून खर्च वजा जाता जी बचत(Savings ) राहते ती आपण वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या साधनात परतावा(Return ) मिळावा म्हणून ठेवतो. बँक एफ डी ,पोस्टाच्या योजना, शेअर बाजार, विमा योजना, अल्पबचत योजना असे ते काही पर्याय.मध्यवर्ती बँकांनी  केलेल्या व्याज दर कपातीमुळे मुद्दल  सुरक्षित ठेवून  परतावा देणारे  जे पारंपारिक गुंतवणुकीचे पर्याय असतात  त्यांच्या परताव्यात घट होते. व  " आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास"
 या म्हणी प्रमाणे महागाई नावाचा राक्षस त्या परताव्यावर  डल्ला मारून तो आणखीनच कमी करतो किंवा कधी कधी तो परतावा  उणे (निगेटिव्ह) पण होतो.

 अशा वेळी मध्यवर्ती बँकांचे हे धुरीण(Policy Makers ) काय भूमिका घेतात ते पाहणे रंजक ठरेल।.

१. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख पॉवेल  म्हणतात " व्याजदर कमी करून प्रचंड प्रमाणात सरकारी रोखे(Govt  Bonds ) विकत घेऊन पैसा मार्केटमध्ये ओतला तरी महागाईचे संकट येणार नाही आणि जरी ते आले तरी ते तात्कालिक स्वरूपाचे असेल(transitory in nature). त्यामुळे पुढील काही महिन्यात किंवा नजीकच्या भविष्यात व्याजदर वाढविण्याची आवश्यकता वाटत नाही."

2. दुसरी गोष्ट भारतातील. RBI ने सरकारला दिलेल्या डिव्हिडंडची घोषणा करताना  अजून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली  ती म्हणजे " या पुढे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई होणार नाहीआणि  सध्या चलनात असलेल्या २००० च्या नोटा हळूहळू  माघारी घेण्यात येतील". त्यासाठी जी कारणे दिली आहेत ती अशी

            i ). नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग ,यूपीआय सारख्या प्रणालीमुळे पैसे आदान प्रदान करण्यासाठी उच्च                           मूल्यांच्या नोटांची गरज नाही.
         ii )    महागाई आटोक्यात असल्याने आणि भविष्यात ती फारशी वाढेल असे वाटत नसल्याने उच्च मुल्यांच्या                     नोटा बंद करण्याची गरज आहे.

 साहजिकच व्याजदर खालच्या स्तरावर राहून जास्त परताव्यासाठी गुंतवणूक पर्याय मर्यादित असल्यामुळे शेअर बाजारातील पैशाचा ओघ नजीकच्या भविष्यकाळात तरी कायम राहील असेच एकंदर चित्र आहे.

 आपण जे पैसे वापरतो त्याला 'फियाट मनी' म्हणतात. सार्वभौम भारत सरकारने आरबीआयच्या माध्यमातून दिलेली शाश्वती आपल्याकडील  कागदाच्या तुकड्याला त्यावर छापलेले मूल्य(Value ) बहाल करते आणि विनिमयाचे साधन(medium of  exchange)  म्हणून आपण ते वापरू शकतो. यातच खरी मेख आहे. सार्वभौमत्व  सरकारला  अमर्यादित पैसा छापण्याची मुभा देते. म्हणूनच Demonetization च्या घोषणेत ही शाश्वती काढल्यानंतर चलनातील 500 वा हजाराच्या नोटा कागज का तुकडा बनून गेल्या. असो !

पैसा जर अमर्याद  छापला तर त्याचे तुलनात्मक मूल्य कमी होते. पैशाच्या प्रमाणात वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन झाले नाही तर  त्यांच्या किंमती वाढून पैशाची क्रयशक्ती (purchasing  Power)कमी होते.

आपल्याला बचतीवर येणारा परतावा कमी ( Low  Returns)  , आणि आलेल्या परताव्याची क्रयशक्ती( Purchasing  Power ) आणखी कमी असा दुहेरी फटका बसतो. हे म्हणजे  बचत करणाऱ्या लोकांविरुद्ध कर्ज उभारणी करणाऱ्या आणि अमर्याद पैसा छापणाऱ्या सरकारांनी पुकारलेले युद्धच म्हणा.( War on savers by  spenders)

त्यामुळेचं  वर्षानुवर्षे जगभरातील लोक अशा एका गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असतात ज्यामध्ये त्यांनी गुंतवलेल्या पैशाचे मूल्य ( Value ) आणि क्रयशक्ती( Purchasing Power ) अबाधित राहील. या गुंतवणुकीच्या पर्यायासाठी काही मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या असतात
१. त्याचा पुरवठा मर्यादित असला पाहिजे. मागणी वाढली म्हणून सहज पुरवठा वाढवता येणार नाही.
२. वस्तू रुपात आर्थिक संस्थांच्या बाहेर तो जतन करून ठेवता येईल.
 
शतकानुशतके हा शोध "सोने" या  गुंतवणूक पर्यायाजवळ येऊन थांबतो. त्याचा पुरवठा मर्यादित आहे. नवीन सोन्याचे साठे सापडणे, त्याचे उत्खनन करणे, मायनिंग प्रोसेस हे अत्यंत क्लिष्ट आहे.  जगभरातील संस्थात्मक गुंतवणूकदार : मध्यवर्ती बँका,  पेन्शन फंड्स,  सार्वभौम गुंतवणूक फंडस्  तसेच तुमच्या माझ्यासारखे छोटे गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. जगभरातील सोने मार्केटची उलाढाल 21 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे.
 जसे फायदे आहेत तसे इतिहासात डोकावले तर यातले धोकेही आपल्या नजरेसमोर येतात. वस्तू रुपात साठवलेले सोने राष्ट्रीय आणीबाणी,  आर्थिक मंदी,  जागतिक महायुद्ध  अशा वेळेला सार्वभौम सरकारने कायदा करून जप्त (Confiscation ) केलेले आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक क्रयशक्ती आणि बचत याबाबतीत फायदेशीर असली आणीबाणीच्या प्रसंगात सरकारकडून घेणाऱ्या निर्बंधाची टांगती तलवार त्यावर सदैव असते.


 गेल्या काही वर्षांत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिस्ट्रीब्यूटर लीजर पद्धतीने काम करणारी क्रिप्टो करेंसी हा एक गुंतवणूक पर्याय म्हणून उभा राहू पाहत आहे. त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे बिटकॉइन ही क्रिप्टो करेंसी डिजिटल गोल्ड म्हणून सुरक्षित गुंतवणूक पर्याय उभा करत आहे। या बिटकॉईन निर्मात्यांनी त्याचा पुरवठा हा मर्यादित राखणार हे निर्मितीच्या वेळेलाच घोषित केले आहे.(२१ मिलियन इतकीच बिटकॉइन तयार केली जातील )

 वैचारिक मतमतांतरे(Polarization ) असलेल्या जगात आता या गोष्टीवरून दोन गट पाहायला मिळतात.  एका बाजूला जुनेजाणते लोक सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.  दुसरीकडे मिलेनियम जनरेशनने बिटकॉईनला आपल्या कवेत घेतले आहे. बिटकॉइनने त्याच्या अत्युच्च पातळीवर असताना एक ट्रिलियन डॉलरची मार्केट उलाढाल नोंदवली आहे.

बिटकॉईन किंवा  क्रिप्टो करेंसी च्या मूल्यात एका दिवसात होणारे चढ-उतार (Price volatility), विनिमयाचे साधन बनण्याची असमर्थता(medium of exchange) आणि  संस्थात्मक गुंतवणूकदारांचा अभाव(lack of Market Makers)   यामुळे डिजिटल गोल्ड चा दर्जा मिळवण्यासाठी अजून बराच पल्ला गाठणे गरजेचे आहे.  या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे सुपर कम्प्युटिंग मशीन वापरून बिटकॉइन उत्खनन करताना वापरली जाणारी प्रचंड ऊर्जा जी पर्यावरण पूरक गुंतवणूक तंत्राच्या एकदम विरुद्ध आहे। ग्रीन एनर्जी वर बनणारी बिटकॉइन  भविष्यात ही दरी भरून काढतीलही.  विनिमयाचे साधन म्हणून वापरता येणारी "stable Coins " सारखी नवी क्रिप्टो करेंसी सुद्धा मार्केट मध्ये येईल . Doge coin सारखी क्रिप्टो करेंसी "Clean , Green Energy mining " मुळें भाव खाऊन जाईल. 
"फियाट मनी " च्या रूपातील पैशाला आव्हान देणाऱ्या या डिजिट क्रिप्टो करेंसी ला देखील बंदीचा सामना करावा लागेल कारण ते सोने असू ते किंवा क्रिप्टो करेंसी, सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान पेलविणे कुठल्याही सरकारसाठी अवघडच मग ते  "Free Market " तत्व जपणारे पाश्चिमात्य देश असोत कि "communism with  Chinese characters" वाला चीन असो .   


सध्यातरी  प्रसिद्ध कमोडिटी इन्वेस्टर  जिम रॉजर म्हणतो तसे " मार्केट मधील तेजी-मंदी चा इतिहास रोचक आहे. "This time it is different" म्हणणारे तेव्हाही होते आत्ताही आहेत.  तरलतेने फुगवलेला मार्केटचा फुगा(Liquidity Driven  Bubble ) फुटणारच नाही त्याबद्दल जगात बहुतेक सर्व लोकांचे जेव्हा एकमत होते  तेव्हा लक्षात ठेवा हीच ती वेळ जेव्हा सामान्य लोकं सोन्याला जवळ करतात".

आता ते सोने "Physical" असावे की "Digital" हाच काय तो आमच्या समोरचा Crisis आहे.

Saturday 15 May 2021

             
                                                                   कालाय तस्मै नमः !

" महाराष्ट्रात मराठे लोकास जो मान आहे तो त्यांच्या वाडवडिलांच्या शौर्यामुळे  त्यास प्राप्त झाला आहे. व तशा प्रकारचे शौर्य ,धाडस व देशाभिमान हे गुण जोपर्यंत त्यांच्यामध्ये जागृत राहतील तोपर्यंत त्यांचा मान कधीही कमी व्हावयाचा नाही. वेदोक्त कर्म करणारे ब्राह्मण पाणी भरतात आणि पुराणोक्त कर्म करणारे मराठे राज्य पदाचा अनुभव घेतात  हे जर आपण डोळ्यांनी पहात आहोत तर वेदोक्त  मंत्रांनी  आपले संस्कार झाले पाहिजेत असा आग्रह धरणे चुकीचे नव्हे काय? संस्काराच्या वेळी वैदिक मंत्र म्हणणे हे आज हजारो वर्षे चालत आलेल्या वही वाटीने एका विशिष्ट जातीतील पुरुषांचे लक्षण झाले आहे परंतु जाती जातीत  जो काही मान आहे तो या लक्षणावर नसून त्या  त्या ज्ञातीत कार्यकर्ते पुरुष ज्या प्रमाणात निपजतात  त्या प्रमाणावर आहे ही गोष्ट इतिहासावरुन सिद्ध होते.  असे असता केवळ अज्ञानाने किंवा मत्सराने एका जातीने दुसऱ्या जातीच्या विशिष्ट लक्षणाचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करावा व त्यास शहाण्या माणसांनी उत्तेजन द्यावे हे बरोबर नाही........ 

..... महाराष्ट्रात मराठी लोकांचा मान कमी आहे असेही नाही व तो वेदोक्त कर्म केल्याने वाढेल असेही नाही तेव्हा  विनाकारण खोट्या अभिमानास बळी पडून मराठे संस्थानिकांनी  राजा या नात्यानेतिऱ्हाईत पणाचा जो अधिकार त्यांजकडे आहेतो अविचारीपणाने  घालवू नये एवढीच त्यास आमची विनंती आहे."

    ------वेदोक्ताचे खूळ:१/२..दिनांक २०/२९ ऑक्टोबर १९०१-केसरी अग्रलेख : लोकमान्य टिळक                

 क्षत्रिय राजा म्हणून शाहू महाराजांना  वेदांचा अधिकार असायला हवा. तो  देण्याचा ब्राह्मणांनी नाकारला. तो वर्णसिद्ध अधिकार मिळवण्यासाठी शाहुंनी लढा देऊन ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणारी मोहीम उघडली." वेदोक्त प्रकरण" म्हणून हा संघर्ष आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात ओळखला जातो.

वर उल्लेख केलेला लोकमान्यांचा केसरीतील अग्रलेख या संदर्भातीलच . लोकमान्यांनी क्षत्रियत्वसंबंधीची  कर्मठ ब्राह्मणांची हास्यास्पद भूमिका उचलून धरली नसती तर वाद इतका विकोपाला गेला नसता. 

पुरोगामी विचारवंत नरहर कुरुंदकर याचा उल्लेख "अभिजात मूर्खपणा" असा करून सांगतात की लोकमान्यांसारखा महान राजकीय नेता परंपरावाद्यांच्या  बाजूने उभा राहिला  व धर्मात लुडबूड न करता पारंपारिक रीतीरिवाज यांचे निष्ठेने पालन करावे अशी भूमिका मांडून गेला.

 या प्रकरणात लोकमान्यांनी अशी तर्कविसंगत भूमिका का घेतली या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे आहे.

  राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम, त्यासाठीचे  राजकारण याला असणारा अग्रक्रम  आणि सामाजिक सुधारणांमुळे समाजात दुही  किंवा गोंधळ निर्माण होऊन आपले प्रयत्न विखुरले जातील ही भीती,  शाहूंच्या भूमिकेला पाठिंबा देऊन  आपला समर्थक ब्राह्मण मंडळींचा पाठिंबा दुरावण्याची  शक्यता यामुळे लोकमान्यांनी राजकारण्याला शोभेल अशी  भूमिका घेतली।
 
वरवर पाहता ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष ही जातीची लढाई  दिसत असली तरी  तो नव्या शिक्षणातून निर्माण झालेला सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक हितसंबंधांचा संघर्ष होता.

 पेशव्यांनी मराठा राज्याच्या कारभाऱीपणाची वस्त्रें मिळविली  तेव्हापासून मराठा राज्यात ब्राह्मणांचे वर्चस्व वाढू लागले. बडोदा, ग्वाल्हेर यासारखी संस्थाने सोडता महाराष्ट्रातील मराठी कुलवंत सरदार घराणी पहिल्यांदा आळसात गेली  व नंतर वैफल्यग्रस्त झाली. पेशवाईच्या उत्तर काळात मराठा समाज खूप पिछाडीवर पडला. १८१८ मध्ये जेव्हा पेशवाई बुडाली  व पुणे ,पश्चिम महाराष्ट्र येथे इंग्रजांचे राज्य आले तेव्हा ब्राह्मण हाच मराठी समाजाचा सर्वेसर्वा होता. राज्य गेले तरी इंग्रजांची चाकरी करण्यासाठी व इंग्रजी भाषा शिकण्यासाठी पुढे आला तो ब्राह्मण वर्गच. शिक्षणात घेतलेल्या पुढाकाराने व त्यायोगे इंग्रजी शासनात मिळालेल्या स्थानाने ब्राह्मण लोकात श्रेष्ठत्वाचा गंड व इतर जाती विषयांची तुच्छता अधिकच वाढली. पारंपारिक उच्च गंडाचे सामुहिक विकृतीत रूपांतर झाले. इतर जाती नगण्य व निष्प्रभ झाल्या. उच्चकुलीन व सरदार घराण्यांनी ही मराठा जाती समूहाला नव शिक्षण देण्यात विशेष रस दाखवला नाही. जणू काही व्यापक सामाजिक जीवनातून मराठा जात निवृत्त झाली. उदासीनता भरून वाहू लागली होती.

 वेदोक्त प्रकरणातील धक्क्यांनी शाहू महाराजांनी जेव्हा या परिस्थितीचे अवलोकन केले तेव्हा जे दृश्य समोर आले ते असे होते.
 
पतपेढी चा कारकून ब्राह्मण, बँक अधिकारी ,सहकारी कर्मचारी ब्राह्मण, शाळेतील शिक्षक ब्राह्मण, सावकार- जमीनदार- व्यापाऱ्यांचे मुनीम ब्राम्हण, डॉक्टर, वकील आणि न्यायाधीश ही ब्राम्हण. या सार्वभौम वर्चस्वाचा पाया होता अर्थातच आधुनिक शिक्षण.

 वेदांचा अधिकार हे जर आपण जातीची उतरंड  मोडून upward mobility साठी  केलेली प्रतीकात्मक गोष्ट मानली तर या प्रतीकात्मकतेच्या  पुढे जाऊन शाहू महाराजांनी बऱ्याच गोष्टी केल्या

    १.  बहुजन समाजात शिक्षण घेण्याची आस त्यांनी निर्माण केली. 
    २. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचाराचा पगडा निश्चित होता पण त्याचबरोबर शाहुंनी मराठा समाजाला व्यापार         व उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. 
    ३. आपल्या संस्थानातील नोकऱ्यांमध्ये 50 टक्के नोकऱ्या ब्राह्मणेतर समाजासाठी आरक्षित ठेवल्या. 
    ४. सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची ऊर्मी ब्राह्मणेतरांमध्ये त्यांनी निर्माण केली.

 शाहूंच्या मदतीने पाठ शाळेतून ब्राह्मणेतर पुरोहित तयार होऊ लागले. सत्यशोधक पद्धतीने धार्मिक विधी ,विवाह मुंज याचे प्रमाण वाढू लागले. पण बरेच ठिकाणी ही परंपरागत जोपासलेल्या "निरर्थक कर्मकांडाची भ्रष्ट नक्कल" होती. पुढे जाऊन हा वैचारिक गोंधळ या चळवळीच्या मुळावर उठला.
      ब्राह्मणेतरांमधील संख्येने मोठा असलेला मराठा समाज; फुले  यांच्या विशुद्ध सत्यशोधक विचारसरणीला फारसा अनुकूल नव्हता. त्यामुळे त्यांनी या चळवळीतील "ब्राह्मण विरोधाचा व्यवहारी मुद्दा" उचलून निवडणुकीच्या राजकारणात कौशल्याने वापरायला चालू केले.  कुलवंत सरदार ,जमीनदार, इनामदार अशा ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना मुख्य प्रवाहातील राजकारणात हिरवी कुरणे खुणावू लागली. याच्यासाठी खुबीने वापरलेली माध्यमे म्हणजे तमाशे आणि जलसे.

    १. १९२०ते १९३० च्या  दरम्यान तमाशा पद्धतीने" टिंगल-टवाळी" करून ग्रामीण भाषेत प्रस्थापित मक्तेदारीचा             बुरखा फाडणारे फड प्रसिद्ध झाले. 
    २. तर दुसरीकडे अश्लील विनोदांनी मनोरंजन करत प्रस्थापितांना झोडपणारे जलसे वातावरणात विखार निर्माण         करू लागले.

 त्याची परिणीती झाली ती राजकीय सत्ता हस्तगत करून मिळणारे फायदे उचलण्यासाठी. बहुजन समाज या चळवळीचा भाग असला तरी त्याचं नेतृत्व मात्र कुलवंत सरदार, जमीनदार यांच्याकडेच राहिले. शेती, शेती आधारित कारखानदारी यातून ग्रामीण अर्थकारणावर पकड मजबूत करणारी आर्थिक हितसंबंधांची एक नवी जुळवाजुळव झाली.गावकुसाबाहेरील बहुजन समाज ,गरीब कुणबी मराठे या नवसत्ताधीशांच्या दावणीला बांधले गेले. शाहूंच्या प्रेरणेने चालू झालेल्या,  सामाजिक सर्वांगीण विकासाची आस लावणाऱ्या, या बहूजनांच्या चळवळीचे रूपांतर  मूठभर सरदारांच्या हातात एकवटलेल्या राजकीय सत्तेत आणि  त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक झुंडशाहीत झाले.

 नाही म्हणायला काही विचारी मंडळी विधायक कार्य उभे करत होती. विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभारलेल्या पहिला सहकारी साखर कारखाना व त्यातील मजुरांच्या मुलांसाठी उभारलेली शाळा हे त्याचे उत्तम उदाहरण. 

दुसरीकडे "लोकमान्यांची आणि शाहूंची कुंडली जुळली असती तर या महाराष्ट्राचं भाग्य काही वेगळं झालं असतं "असा मध्यम मार्गी विचार मांडणारं, सुसंस्कृत मराठा नेतृत्व यशवंतराव चव्हाण जे फुले, टिळक ,शाहू या लोकांचे सकारात्मक विचार पुढे घेऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल करावी यासाठी कटिबद्ध राहिले.

 जी गोष्ट इंग्रजांच्या राज्यात  सर्व क्षेत्रातील मक्तेदारी मुळे ब्राह्मण समाजाची झाली;  तीच गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळात  राजकीय आणि आर्थिक वर्चस्वामुळे कुलवंत सरदार आणि जमीनदार लोकांची झाली. बहुजन समाज हा फक्त वोट बँक झाला  व प्रगतीसाठी लागणाऱ्या शिक्षण वगैरे सुविधा त्याच्यापर्यंत पोचल्या नाहीत.

१९९० च्या दशकात  चालू झालेल्या "मंडल कमंडलच्या" राजकारणामुळे याची दिशा बदलली. मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार समाजातील अनुसूचित जाती ,जमाती, भटक्या विमुक्त जमाती, अन्य मागासवर्गीय लोक यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या यामध्ये आरक्षण मिळाले. सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर जो समाज गावकुसाबाहेर जीवन जगत होता त्याला मुख्य प्रवाहात येण्याची मोठी संधी प्राप्त झाली.सत्तेची फळे मुठभर कुलवंत सरदार व जमीनदार मराठे यांनीच चाखल्यामुळे  गरीब मराठा, कुणबी मराठा शेती सारख्या निसर्गाच्या लहरीवर असणाऱ्या व्यवसायातच अडकला.सहाजिकच सरकारी नोकऱ्या, डॉक्टर, वकील न्यायाधीश ,यासारख्या व्यवसायांमध्ये ब्राह्मण समाजाबरोबर बहुजन समाजातील हुशार तरुण दिसू लागले. स्मरणरंजनात रमलेला, बेभरवशाची शेती करणारा ग्रामीण गरीब मराठा तरुण या मध्ये कुठेच नव्हता. मग आता  या समाजाच्या विकासासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर पकडू लागली. 

लोकमान्यांप्रमाणे प्रमाणे आजच्या पिढीतील राजकारणी लोकांनी सुद्धा  लोकानुयायी भूमिका घेऊन  आयोग नेमून "मराठा समाज हा का आणि कसा मागास आहे" ते दाखवण्याचे प्रयत्न केले. मराठा संघटनांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी लाख लाख लोकांचे मोर्चे राज्याच्या विविध भागांमध्ये काढले. विशेषाधिकार वापरून तरी मराठा समाजास आरक्षण द्यावे यासाठी सरकारवर दबाव दिवसेंदिवस वाढू लागला. पूर्वी चळवळीमध्ये जे काम तमाशा आणि जलसे करत होते ते काम  आता मोर्चे आणि मराठा संघटनांचे मेळावे करत होते. पूर्वी अश्लील विनोद यांनी भरलेले जलसे वातावरणात विखार निर्माण करत  तर आता "मुख्यमंत्री साहेब आरक्षण मागतोय तुमची बायको नव्हे" अशा प्रवृत्ती ते काम चोख बजावत होत्या।

जातीची उतरंड नष्ट करण्यासाठी झालेली   वेदोक्ताची चळवळ असेल किंवा  आता "मागास बनवून आरक्षण द्या" यासाठी चाललेले आंदोलन असेल भरडला जातोय तो गरीब मराठा.

 त्याच्याकडे पाहून एवढेच म्हणावेसे वाटते

 कालाय तस्मै नमः !


संदर्भ :

"राजर्षी शाहू महाराज  आणि वेदोक्त प्रकरण "- उत्तम कांबळे 
"सहकाऱधुरीण "-अरुण साधू 

Sunday 16 August 2020

          No Time To Pause: The Dark Side Of The Attention Economy    Attention Economy & Cancel Culture 


कोविद -१९ विषाणूवर प्रभावी ठरणारी आणि त्याला आटोक्यात आणण्यासाठी  उपयोगी ठरेल अशा रोगप्रतिकारक लस निर्मितीचे  जगभर चाललेले  प्रयत्न आणि त्याला मिळणारे सुरवातीचे सकारात्मक निष्कर्ष  यामुळे या आरोग्य विषयक संकटावर आपण मात करू अशी आशा निर्माण झाली आहे . त्याचमुळे असेल कदाचित या आरोग्य महामारीने निर्माण केलेल्या आर्थिक संकटाची व्याप्ती आणि त्यावरचे उपाय यावर सविस्तर चर्चा होताना दिसतात .  देशाची अर्थव्यवस्था  रुपी किल्ल्याचे  व्यापार उदीम , रोजगार , शेती , वित्त संस्था  असे जे बुरुज असतात ते  काय परिस्थितीत आहेत , कुठे ते पूर्णपणे ढासळले आहेत किंवा कुठल्या बुरुजाला जुजबी डागडुजी करून काम पुढे नेता येईल , कुठल्या बुरुजाने या संकटाचा प्रभावी मुकाबला करत किल्ला लढवीत ठेवला याचा उहापोह देशोदेशीची सरकारे किंवा अर्थतज्ञ करताना दिसत आहेत . 

विन्स्टन चर्चिलने म्हटल्याप्रमाणे " Never Waste a Good Crisis" या उक्तीप्रमाणे अशी जागतिक संकटे  सध्या अस्तित्वात असलेल्या सामाजिक , शासकीय , आर्थिक आणि औद्योगिक व्यवस्था , प्रणाली याचे पुनरावलोकन करण्याची संधी देतात .  त्यातून मग या  संकटाला जबाबदार ठरवून दोषारोप ठेवण्यासाठी काही "Soft Targets " निश्चितच हाती लागतात , तसेच या आपत्तीला इष्टआपत्ती मध्ये परावर्तित करणारे "Change Agent " पण प्रकाशात येतात . लोकानुनयी योजना राबविताना मर्यादित आर्थिक कुवतीमुळे सामाजिक आरोग्य व्यवस्थेची  झालेली दुर्दशा आणि  त्यामुळे या महामारीशी लढताना येणाऱ्या मर्यादा यामुळे मायबाप सरकार निश्चितच "Soft Target " ठरते 
त्याचवेळेला  या आरोग्य संकटाचा मुकाबला  करताना संवादाची , करमणुकीची , खरेदीची , कामाची  गरज घरबसल्या पुऱ्या करणाऱ्या "टेलिकॉम  & इंटरनेट " कंपन्या आणि त्यावर आधारित समाजमाध्यमे (Social Media ) व   त्यातून निर्माण होणाऱ्या Social Commerce किंवा financial Inclusion च्या संधी  यांच्याकडे यजमान पद जाते  या संकटातील "Change Agent " चे . या "Change Agent " मधील म्होरके म्हणजे FAANG Club  अर्थातच फेसबुक , अमेझॉन , अँपल , नेटफ्लिक्स आणि गूगल  या महाकाय जागतिक कंपन्या व त्यांच्यातील Dogfight . 

आपण  कुठला फ़ोन वापरणार , काय पाहणार , किती  मंचावर (Screens)  वर पाहणार, काय विकत घेणार , कसे पैसे भरणार किंवा  कुठली माहिती आपल्याला दिसणार   यासाठी चालू झालेली  जीवघेणी  स्पर्धा म्हणजेच dogfight
आपल्याला   या  स्पर्धेत ओढण्यासाठी वापरले जाणारे हत्यार म्हणजे आपले "Attention ".  यात पणाला लागले आहे  ते  माहिती अणि संवाद विश्वाचे भविष्य। कारण "Attention किंवा लक्ष्यपूवर्क ऐकण्याची  किंवा पाहण्याची वृत्ती " ही मर्यादित आहे आणि "Information  किंवा माहिती " ही अमर्यादित आहे .  त्या अर्थाने ही स्पर्धा त्या मर्यादित Attention वर कब्ज्जा मिळविण्यासाठीचा खटाटोप आहे . 

Attention हा शब्द आपण  रोजच्या जीवनात अनेक अर्थाने वापरतो .  प्रेम (Love ), प्रसिद्धी (Recognition), आज्ञापालन (Obedience), मदत (Help ). असे मानवी भावभावनांचे वेगवेगळे कंगोरे स्पर्शुन जाणारी  अशी ही मानसिक अवस्था आहे . "Attentive Care " मध्ये ती वात्सल्य भावना घेऊन येते तर "Attention .. सावधान " मध्ये कडक शिस्तीची अपेक्षा ठेवते . दुसरीकडे " somebody  propelled into  attention(Limelight ) मध्ये ती प्रसिद्धीशी  हातमिळवणी करते   किंवा " He or She needs attention " मधील सेवाभाव किंवा मदत  ही भावना प्रदर्शित करते . 

पण हेच "Attention " जर भांडवल म्हणून वापरले  आणि " Eyeballs , Clicks , likes , hashtags आणि emojis " या अस्त्रांचा वापर करून अमर्यादित माहिती (Limitless Info ) जर आपण ग्राहकांवर वर्षाव करत राहिलो  तर Communication (संवाद ), Commerce ( व्यापार ), Information ( माहिती ) आणि  inclusion (सर्वसमावेशकता ) या वर आधारित जी अर्थव्यवस्था जन्माला आली ती म्हणजे " Digital Economy " किंवा " Information Economy".  संवादापासून ज्ञानापर्यंत आणि मनोरंजनापासून ते व्यापारापर्यंत  विस्तार असणाऱ्या या अर्थव्यवस्थेचे भांडवल जे मर्यादित आहे  ते म्हणजे "Attention " म्हणून  १९७१ साली नोबेल विजेते मानसशात्रज्ञ आणि अर्थतज्ञ  हर्बर्ट सिमोन यांनी  या व्यवस्थेला " Attention Economy " असे नाव दिले . 

मानसशास्त्रीय  व्याख्येनुसार "Attention " म्हणजे " मनाची अशी अवस्था जिथे सर्व  शक्ती किंवा लक्ष्य एखाद्या गोष्टीवर केंद्रित करणे आणि  बाकीच्या गोष्टीचा तात्पुरता विसर पडणे ." यावरून आपल्या लगेच लक्षात येईल की  "Attention " ही एक अशी गोष्ट आहे जे ठरविते की  आपण काय पाहतो आणि त्या पाहिलेल्या गोष्टीबद्दल आपण काय कृती करतो  म्हणून  या नवीन माहिती आधारित इकॉनॉमी मध्ये सर्वात  महत्वाचा asset जर कोणता असेल तर हे " Attention ".  आणि  दुसरीकडे आहे अमर्याद अशी माहिती .  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम  च्या अहवालानुसार  दर दिवशी ४६३ एक्क्साबीट्स एवढ्या  प्रचंड डेटा किंवा माहितीची देवाणघेवाण केली जाते . समजायला सोपे म्हणून  हा डेटा  म्हणजे रोज २२ करोड DvD निर्माण केल्याच्या बरोबरीचा आहे . 


कोणत्याही वस्तू किंवा सेवा व्यापाराचा एक नियम असतो तो म्हणजे  मागणी आणि पुरवठा यातील संतुलन जे बाजाराच्या नियमाप्रमाणे  त्या व्यापारातील वस्तू किंवा सेवेचा बाजारभाव (Right Price ) ठरविते .हा नियम जर आपण "Attention Economy " ला लावला तर काय दिसते मर्यादित "Attention " वर  माहितीचा भडीमार करून जास्तीत जास्त लक्ष वेधण्याचे  आणि वेगेवेगळ्या जाहिराती, सवलती किंवा वेगळ्या प्रणाली वापरून मर्यादित Attention मधील जास्तीत जास्त ताबा मिळविण्याचा यत्न दिसतो . बर एकीकडे माहितीचा भस्मासुर वाढलेला असताना माणसाची लक्ष देण्याची वृत्ती (Attention ) याचा आवाका वाढल्याचे कुठे आढळत नाही . त्यामुळे  मग खऱ्या विक्रीपेक्षा Eyeballs , Clicks , likes , hashtags आणि emojis यांच्यावर विसंबून राहून किती वेळ आणि किती प्रमाणात ( Quality & Quantity of Attention ) आपण ग्राहकाला खिळवत ठेवले असे मापदंड उदयाला आहे .  प्रत्यक्ष विक्री किंवा नफा यापेक्षा ग्राहक संख्या , त्यांच्या Clicks किंवा hits यावर  यशाचे मोजमाप चालू झाले .  थोडक्यात  आपल्यापेक्षा आपला वेळ हाच या डिजिटल क्षेत्राने  खरेदी आणि विक्रीला  काढला . 

यामुळे काय झाले तर मिळालेला वेळ प्रभावी पणे वापरण्यासाठी या कंपन्यांनी  आपले  सॉफ्टवेअर , analytics टूल्स वापरून ग्राहकाला आवडणाऱ्या , त्याला रुचणाऱ्या , त्याला प्रभावित करणाऱ्या , त्याला आनंदी करणाऱ्या गोष्टीच निवडून त्याच्या समोर ठेवायला सुरुवात केली . त्याचे निकष  हे लक्षवेधी किंवा वेगळ्या गोष्टी दाखविण्याकडे होते कारण पुन्हा "eyeballs किंवा clicks " चे अर्थकारण .  यातून  या आभासी दुनियेत  सुखी जीवन अनुभव , आपले कसे बरे चालले आहे हे दाखविणारे वृत्तांकन , राजकारणी किंवा फिल्म स्टार्स यांचे "Larger Than Life " असे वर्णन करणाऱ्या बातम्या किंवा व्हिडिओ याचीच भाऊगर्दी झालेली दिसते . यातून फक्त स्वतःवर प्रेम करणारी , आपला दृष्टिकोन हाच "Worldview " मानणारी , वास्तविकतेपासून तुटलेली अशी नेटिझन्स ची एक पिढी निर्माण झाली. "काहीतरी अफाट " च्या नावाखाली आचरट चाळे ,PDA च्या नावाखाली शारीरिक जवळीक , प्रेरणादायी जीवनशैलीच्या जाहिरातीसाठी संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन आणि आपण किती क्रांतिकारी या नावाखाली कुठलीही अतरंगी गोष्ट  करण्याची तयारी  यामुळे  एक वेगळ्या प्रकारचा "complex " घेऊन ही पिढी वावरू लागली . 

एकाग्रता आणि मानसिक शांतता  हाच शत्रू असल्यामुळे  या एकाग्रता रुपी विश्वामित्राच्या तपश्चर्येचे भंग करण्यासाठी  आणि आपली लक्षपूर्वक पाहणे आणि ऐकणे ही सवय कमी करण्यासाठी  likes , clicks  किंवा hastag  वर आधारित  बक्षीस रुपी मेनका  सदैव तैनात करण्यात आल्या . 

यामुळे झाले काय तर " वादे  वादे जयते तत्त्वबोध:" या संस्कृत सुभाषिताप्रमाणे " वेगवेगळ्या  विचारधारा आणि तत्त्व प्रणाली यांच्या विचार मंथनातून सत्य  बाहेर येते " हा विचार मागे पडून मला जे दिसते आणि मला जे पटते तेच अंतिम सत्य असा थोडासा "Narcissist " विचार प्रबळ होताना दिसून येतो . यातून मग आपल्यापेक्षा वेगळे मत असणाऱ्या लोकांचा दुस्वास किंवा त्यांचा विरोध अश्या घटना सर्रास घडताना आपण पाहतो .  पूर्वी ७० ८० दशकात  हिंदी सिनेमातला हिरोईनच्या मागे लागलेला खलनायक जसा " तुम मेरी नही तो किसकी नही हो सकती " असे म्हणायचा त्याचेच आजच्या डिजिटल जगातील नवे प्रारूप म्हणजे "Cancel Culture ". 

पूर्वी आपल्याला आवडत नसलेल्या व्यक्ती किंवा विचाराकडे आपण दुर्लक्ष करायचो , आता तेवढ्यावर भागात नाही , आता आपण त्यांना "Cancel " करतो . trolling , body Shaming अशा आता रुळलेल्या मार्गापासून ते  अगदी त्यांच्या व्यावसायिक बाबींमध्ये ढवळाढवळ इथेपर्यंत याची मजल गेलेली दिसून येते . जीवनातून उठविणे म्हणजे "Cancel Culture ". 

त्यामुळेच स्वातंत्र्यदिन साजरा करताना "स्वातंत्र्य  आणि स्वैराचार ", "अधिकार आणि हक्क " " मतमतांतर आणि दुस्वास " यातील अदृश्य सीमारेषेचे आकलन होऊन  आपण मार्गक्रमण करायचे ठरविले  तर ती " breaking News " ठरेल हे निश्चित . 

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा . 



Sunday 21 June 2020

Bajaj Capital Mutual Fund  श्रेयस की  प्रेयस : Kotlar Way 

कोविड  १९  विषाणूने  जगावर लादलेला   करोना  अणि त्यातून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जगभरात लागू झालेले "lockdown " यामुळे  आरोग्य विषयक समस्या ही एका गहन  आर्थिक प्रश्नात  रूपांतरित झाली ।  साहजिकच आता "पुनश्च  हरिओम " म्हणून जगरहाटी रुळावर येत असताना  या  संकटाचा आवाका  अणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देशोदेशींच्या सरकारने राबविलेले उपक्रम किंवा घोषित केलेली वित्तीय मदत (Packages ) याचा बराच  गाजावाजा  सध्या आपण माध्यमांमध्ये ऐकतो आहोत।  भारताबद्दल बोलायचे तर  आपल्या सरकारच्या  रुपये २० लाख कोटीच्या  आत्मनिर्भर  package वर प्रचंड  चर्चा  झाली।  मोदी भक्तांसाठी "वित्तीय तूट नियंत्रणात ठेऊन जाहिर केलेले ते स्मार्ट  package" आहे  तर मोदी विरोधकांसाठी "प्रत्यक्ष मदत न करता कर्जावर आधारित  तोंडाला पाने पुसणारे package" आहे। 

राजकीय  अभिनिवेश बाजूला ठेऊन याचा विचार केला तर करोनाच्या आधीचे  अर्थकारण अणि जागतिक व्यापार उदीम याचे जे प्रारूप होते त्याच्याशी सुसंगत असे ते package आहे। भांडवलशाही अणि मुक्त व्यापार यावर आधारित जागतिकीकरण या व्यवस्थेचा पायाच मुख्य:त दोन घटकांवर आधारित होता
  • नैसर्गिक साधनसंपत्ति अमर्याद आहे  या अंधविश्वासावर (?) आधारित  , स्वस्त कच्चा माल अणि देशोदेशीचे स्वस्त कामगार यांच्या बळावर अव्याहत  वेगवेगळ्या  वस्तू अणि सेवांचे  उत्पादन(Ability to produce )  करत राहणे 
  • त्या वस्तू अणि सेवा खरेदी करणारा  ग्राहक अणि त्याची  उपभोग  घेण्याची( Ability to  consume ) वृत्ती अमर्याद आहे।  ती तशी रहावी यासाठी जाहिरातींच्या क्लुप्त्या अणि  कर्ज काढून "जिओ जी भरके " चा नारा मदतीला आहेच। 
"Deferred Gratification"  ते " Instant Gratification" हे बदललेले  आजचे जीवनसूत्र जन्माला आले ते याच धर्तीवर ।  सुखमय जीवनाची व्याख्या  अर्थातच भौतिक सुखांच्या पार्श्वभूमीवर होऊ लागली।   काटकसरीने संसार करुन  आयुष्याच्या संध्याकाळी जमेल तेवढी  भौतिक सुख उपभोगायची (Deferred Gratification) हा विचार मागे पडून  "या सुखांनो या " ऐसे म्हणत उधारीवर ( Credit) का होईना पण सुखांना आलिंगन देण्याची  आणि  जगण्याचा आनंद हा "आज आत्ता  इथे "(Instant Gratification)  घेण्याची प्रथा रूढ़ झ ा ली।

अश्या स्वप्नाच्या दुनियेचा अजून एक नियम असतो की ती स्वप्ने दाखवून , तुम्ही पण ती पूर्ण करू शकता असे सांगणारा एक ड्रीममर्चेन्ट जरुरी असतो. ते  ड्रीममर्चेन्ट  होते  जगातील  मातब्बर मार्केटिंग गुरू  अणि त्यांचे अस्र होते  "4P's  ऑफ़  मार्केटिंग" : Product ( उत्पादन ), Price ( किंमत  अणि ते घेण्यासाठीचे कर्ज पर्याय ), place ( वितरण व्यवस्था ) अणि promotion ( जाहिरात ). पहिल्या दोन गोष्टी जागतिकीकरणाने सहज साध्य करून  दिल्या। वस्तू विकणाऱ्या कंपन्यांनी  वितरणाची जबाबदारी पेलली  अणि  ही संसाधन सज्जता विक्री (sales ) अणि  नफा ( Profits ) याच्यात रूपांतर करण्याची  कामगिरी पार पाडली  या ड्रीममर्चेन्ट लोकांनी।

जगभरातील मार्केटिंग गुरू याचे वर्णन  " Conspicuous Consumption ( महागड्या गोष्टींची खरेदी  करून आपले सामाजिक स्थान उंचावणे ) असे करतात।  यातून निर्माण झालेल्या " Conspicuous Consumption lifestyle " या  जीवन शैलीची वैशिष्टे होती "4P's  ऑफ़  Status Display Syndrome": Pride (अभिमान ), Prestige (सामाजिक स्थान ), possessiveness (मालकी हक्काची भावना ) अणि Power ( मुठ्ठी में दुनिया चा एहसास ).

.थोडक्यात काय तर  "प्राप्तीचा आनंद " हा त्याच्या मुळाशी होता।  भारतीय संस्कृतीत वर्णन केलेले " जीवनाचे प्रेयस  म्हणजेच हाच प्राप्तीचा आनंद किंवा इन्द्रियांचे तुष्टीकरण "

या पार्श्वभूमीवर आपल्याला लक्षात येईल की देशोदेशीच्या सरकारांनी दिलेली stimulus packages ही "कर्ज काढा & खर्च करा  किंवा कर्ज काढ़ा & उत्पादन करा " या विचाराभोवती घुटमळताना आढळते।  तरलता ( Liquidity ) वर आधारित ही  घोषणा त्यामुळे  माणसाच्या जीवन प्रेयसाला चुचकारून "Animal Spirit " निर्माण करण्याचा प्रयत्न करते। 

 करोना अणि त्यानंतर आलेले  "lockdown " यामुळे  माणूस स्व:त चा जीव वाचविण्यासाठी  का होईना  पण जो घरात कोंडला गेला तेव्हा  कुठे "गरजा अणि चैन " यातील फरक ध्यानात येण्यासाठीचा मोकळा वेळ त्याला मिळाला अणि जगण्याचा आनंद हा "आज आत्ता  इथे" घ्यायच्या अट्टाहास अणि आयुष्य  हे एका "स्प्रिंट " सारखे धावण्याची  खरेच गरज आहे का  याचा विचार करण्याची संधी निर्माण झाली।

 वर उल्लेखलेल्या  ड्रीममर्चेन्ट पैकी एक अतिशय प्रसिद्ध नाव म्हणजे " फिलिप कॉटलर ".आधुनिक मार्केटिंगचे जनक अशी बिरुदावली सार्थपणे मिरविणारे  हे महाशय यांचा नुकताच वायरल झालेला  लेख।  ज्यामध्ये  कॉटलर यांनी  सध्या चालू असलेल्या  करोना  आपत्तीचा  व त्या निमित्त्याने  ग्राहकांच्या विचारात होणाऱ्या बदलाचा (Consumer sentiment & behaviour) घेतलेला आढावा। "Status Display Syndrome" मध्ये अडकलेला  ग्राहक "Lockdown " संपल्यानंतर  ते चुकलेले "Animal Spirit " पुन्हा अनुभवण्यासाठी बाहेर पडेल अणि ज्याला "Revenge Shopping" म्हणतात त्यानुसार पुन्हा  भरपूर खरेदी करेल अशी अटकळ लावली जात असताना  कॉटलर यांचे विवेचन अणि  पुढील काळात होऊ घातलेले बदल  या बद्दलचे त्यांचे विचार नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे।

"The Sarasota Institute " या  Think Tank  ने कॉटलर यांचा हा लेख प्रसिद्ध केला , त्या नुसार  ग्राहकचा प्रवास हा"Revenge Shopper" कडून " Rational  Shopper " कड़े होईल असा प्राथमिक नित्कर्ष काढता येईल।  करोना च्या संकटामुळे  एकूणच आपले जीवन , आरोग्य , गरजेच्या वस्तू ,  नोकरीतील अनिश्चितता   या पार्श्वभूमीवर  थोड्या कमी खरेदीकडेच लोकांचा कल असेल अणि या ग्राहक राजाला आपल्याला ४-५  गटात विभागता येईल।

१. Life Simpler:  जगण्यासाठी उपयुक्त आणि  गरजेच्याच वस्तू वापरण्याकडे या लोकांचा कल असेल।  ते कमी अन्न किंवा वस्तू विकत घेतील।  त्यांच्याकडे जे साठविलेले , विकत घेतलेल्या गोष्टींपैकी ज्या वस्तू वापरल्या जात नाहीत त्याचा ते  त्याग करतील।  नवीन वस्तू किंवा सेवा विकत घेण्यापेक्षा " वापरावर आधारित  खरेदी "( Pay per  Use ) कडे  त्यांचा अधिक ओढा असेल।

२.  Degrowth Activist :  "Status Display Syndrome" व  तो पूर्ण करण्यासाठी  सतत उत्पादन यामुळे मर्यादित नैसर्गिक संसाधने  संपण्याचा धोका  हे लोक व्यक्त करतात।  भौतिक सुखे मर्यादित राखून , आपल्या गरजा कमी करण्याकडे यांचा कल दिसतो।

३. Climate Activist: यात प्रामुख्याने  निसर्ग प्रेमी , पर्यावरणवादी  यांचा समावेश होतो।  भौतिक सुखे , ती पूर्ण करण्यासाठी सतत होणारे उत्पादन , त्यातून होणारे प्रदुषण  याचा आपल्या वातावरणावर  विपरीत परिणाम होत आहे।  पुढील पिढीसाठी  स्वच्छ हवा , पाणी  या उपलब्ध करून द्यायच्या असतील तर "GDP(सकल राष्ट्रीय उत्पन्न )" बरोबरच किंबहुना जरा जास्तच "GDW- Gross  Domestic wel -fare ( सकल लोकांचे कल्याण )" कडे लक्ष्य द्यावे लागेल।  त्यासाठी ओघाने सध्याची  उपभोग संस्कृति बदलून  उपयोगयुक्त  जीवनशैलीकड़े वाटचाल ही या लोकांना अत्यंत महत्त्वाची वाटते।

४. Food Choosers: " Be Vegan"( शाकाहारी बना ) या ब्रिगेडचे लोक या गटाचे भाग आहेत। फ ळे , भाज्या  यावर आधारित आहाराचे समर्थन करणारे हे लोक  " जीवो जीवस्य जीवनम " या जंगलाच्या व्यवस्थेला विरोध करत  अन्नासाठी प्राणीहत्या कमी करावी अशी आग्रही भूमिका घेतात।

५. Conservation Activist :   पूर्वी आपल्याकडे  जुन्या वस्तू दुरुस्त करून वापरण्याची जी पद्धत होती त्याचे समर्थन करणारे लोक या गटात मोडतात।  कमी पण टिकाऊ गोष्टी बनविण्याकडे यांचा विचार दिसतो।  जाहिरात क्षेत्रात ज्याला "Planned Obsolescence" म्हणतात ज्यातून मग " limited edition "वॉच किंवा कपडे किंवा कारची मॉडल्स यांचे अवडंबर माजते त्याला या लोकांचा विरोध आहे।  या जाहिरात क्लुप्त्यांमुळे "सतत नाविन्याचा & त्यातून चुचकारले जाणारे  "4 P's  of Status Display Syndrome" चा धोका  जगाला आहे असे या लोकांचे म्हणणे आहे।  थोडक्यात "Exclusivity " पेक्षा " Endurance & durability" गरज यांना जास्त वाटते।

थोडक्यात  ग्राहकाची वाटचाल " Rational Consumer" कडे होईल असे  कॉटलर यांना वाटते।  करोनाच्या  पार्श्वभूमीवर  एकूणच  जीवन , आरोग्य , कुटुंब यांचा सारासार विचार होत असताना  भौतिक सूखे अणि त्यातून होणारा प्राप्तीचा आनंद या पेक्षा जीवनाचा खरा अर्थ समजावून घेण्याकडे कल वाढत जाईल असे एकंदर चित्र आहे।  जीवनाचा खरा अर्थ म्हणजे अधात्म्य किंवा  भौतिक गोष्टींचा त्याग अशी काहीशी समजूत होण्याची शक्यता आहे तर  ते तसे नसून  जीवन ध्येय , त्यासाठीचे प्रयत्न , त्याच्या यश अणि अपयशाच्या कहाण्या असा सुरस प्रवास अपेक्षित आहे।   भारतीय संस्कृतीत त्याला " जीवनाचे श्रेयस " असे म्हटले जाते।

माणसाच्या आयुष्यात कायम प्रेयस ( प्राप्तीचा आनंद : Consumerism ) अणि श्रेयस ( जीवनाचा अर्थ व  ध्येय )  यांचे द्वंद  चालू असते।  प्रेयस  हे नेहमीच  विलोभनीय असते कारण त्यातून  इन्द्रियांचे तुष्टीकरण सहज होते।  जीवनात काय गरजेचे आहे , त्याचा अर्थ काय हे म्हणजे श्रेयस।


करोनाच्या  पार्श्वभूमीवर आज साजरा होणारा " Yoga Day  " आरोग्याचे , "Father's Day" हे कृतज्ञता   व्यक्त  करण्याचे  अणि  " Solar Eclipse " हे  विज्ञानाचे प्रतिक मानले तर  तो "Celebrate " करून "प्रेयसाला " चुचकारण्यापेक्षा  ते रोजच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनवून  जीवनाचे श्रेयस शोधण्यासाठी केला तर तो  निश्चितच स्वागतार्ह  बदल  ठरेल।


  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...